आधी कळवतो की 'येईन'
आपणही तयारी करतो त्याच्या स्वागताची
आपणही तयारी करतो त्याच्या स्वागताची
पण त्याच्या शब्दावर विश्वास कसा ठेवावा?
वाट बघण्यातच आपले चार दिवस निघून जातात
रोजची कामं आपण सुरळीत चालू करतो
आणि मग अचानक, एखाद्या सकाळी सकाळी
दाणकन येतो सगळ्या लवाजम्या सकट
अंगणात, घरात, झोपेत, मनात, विचारात असा शिरतो...
आणि सगळीकडे पसारा करून ठेवतो.
आपली कमालीची धांदल उडते
पण तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...
झाडांच्या डोक्यावर टपली मारून त्यांची पानं-फुलं खाली पाडतो
वाफे-आळी मोडून लहान लहान ओहोळांना पकडा - पकडी खेळायला सोडून देतो
पागोळ्यांची माळ तोडून ओसरीवर मोती पसरवून ठेवतो
मातीचा रंग अंगणभर सांडून ठेवतो
छपरावर नाचून नाचून अगदी गोंगाट माजवतो
तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...
दाराला लावलेले उबेचे पडदे विस्कटून घरभर गारवा पसरून ठेवतो
आल्याचा चहा आणि कांदा भजीच पाहिजेत असा हट्ट करत,
स्वयंपाकघराच्या खिडकीत ठाण मांडून बसतो.
गौड मल्हार, मेघ, मिया मल्हार... सगळ्यांचे सूर एकच वेळी उधळायची घाई करतो
सगळ्या कामांना बुट्टी देऊन त्याच्याबरोबर भटकायला जायची गळ घालतो
तुषार, चैतन्य, प्रफुल्ल, हर्ष अश्या ढीगभर मित्रांना गोळा करून नुसता दंगा घालतो
तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...
कपाटात कोंबलेल्या सगळ्या निळ्या- हिरव्या आठवणी खसकन बाहेर ओढून काढतो
लहानपणी दोघांनी मिळून सोडलेली होडी कुठपर्यंत पोचली विचारत राहतो
त्याच्या आणि माझ्या हातात हात गुंफून काही काळ नाचलेल्या त्या तिसऱ्याची चौकशी करतो
फक्त त्यालाच सांगितलेली गुपिते फोडायची धमकी देतो
दिवसभर भंडावून सोडल्यावर पुन्हा रात्री स्वप्नात येऊन चिडवत राहतो
तरीही त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...
माझ्या चिमुकल्या अंगणात उत्साह भरून जातो...
माझ्या एकट्या घराला जिवंत करून जातो...
माझ्या व्याकूळ मनाला सोबत करून जातो...
सांगून जातो की पुन्हा येईन,
पण त्याच्या शब्दावर विश्वास कसा ठेवावा?
_ जुई
पाऊस! मस्त लिहिली आहेस कविता! एवढे दिवसांनी आज लिहायला वेळ झालेला दिसतोय तर! :-)
ReplyDeletewah...
ReplyDeletesurprisingly, same lines war me pan lihila ahe...share karato...
zakas!!!
ReplyDelete-- Kashyap