Monday, March 28, 2011

चंद्र अवचित...

तशी मीही अजून जागीच आहे...
पण निजेला परतवते आहे ... कारण तू ही जागा आहेस.

चल,
वाऱ्यावर तरंगत आलेल्या या मोहक क्षणाचा हात धर...
आणि मांजर-पावलांनी अलगद ये माझ्या बरोबर...
तशी आपल्या सुखाची फुलं उमलली आहेतच ...
पण हवेत सुगंध भरलाय... तो बहुदा चांदण्यांचा.

ऐक,
सगळीकडची निरव शांतता... 
निश्वासांचे हुंकार सुद्धा विरघळून गेल्यासारखी ... 
तशी मी तुझ्या कानात गुज सांगते आहे...
पण कुठूनशी कुजबुज ऐकू येतीये ... ती रातराणीची 

बघ, 
सगळं शहर झोपेच्या धुक्यात बुडलंय.
त्याच्या वर-खाली होणाऱ्या श्वासांच्या लाटेवर झुलताना वाराही मंद झालाय...
तसा थोडा गारवा आहे हवेत...
पण शहारा आलाय... तो तुझ्या स्पर्शामुळे...

थांब,
बोलू नकोस काही ... आणि हलू नको जरासुद्धा..
हा क्षण संपण्याआधी साठवून घे मला तुझ्यात..
तशी पौर्णिमाच आहे आज...
पण चंद्र अवचित ग्रासलाय ... तो तुझ्या माझ्या एकांतासाठी...

___जुई


Monday, March 21, 2011

तुकडे

खिडकीवर सारलेल्या गडद पडद्याच्या फटीतून  
एक कोवळी तिरीप पाझरली 
आणि तुझ्याशी ओळख झाली 
त्या सोनेरी तुकड्यामुळे  ...

नंतर मग ...
वेगवेगळ्या झरोक्यातून, खिडक्यांतून, दारातून
आत आलेले ते पिवळे, निळे, राखाडी, सप्तरंगी तुकडे 
माझ्याशी लपा-छपी खेळत राहिले...
भिंगातून संकोचलेले...
गजांमध्ये दुभागलेले...
डबक्यामध्ये विरघळलेले ...
चष्म्याच्या आड काळवंडलेले ...
फाटक्या छपरातून सांडलेले...
असंख्य तुकडे.

अश्या तुकड्या-तुकड्यांमधून हुलकावणी देणारा तू 
आणि ते झेलताना भान हरपलेली ध्यासवेडी मी...
कधी त्यातून तुझं चित्र  साकारतंय का बघणारी,
कधी त्यात तुझं प्रतिबिंब उमटतंय का याची वाट पाहणारी,
कधी त्यातून तुझी मूर्ती घडतीये का शोधणारी...

जसजसे तू उधळत असलेल्या तुकड्यांचे रंग होऊ लागले गडद ...
आणि कंगोरे अधिक बोचरे,
तसतशी मी शहाणी होत गेले...
कितीही सांधले तरी तुझं आदिम, अनंत रूप त्या तुकड्यात थोडंच भेटणार होतं मला...
ते झेलण्यासाठी त्यांच्या मागे धावताना मला माझी वाट मात्र सापडली.
मग तुझी निशाणी म्हणून त्यातला एक पारदर्शी तुकडा डोळ्यात बसवून घेतला, 
आणि बाकीचे सोडून दिले ओंजळीतून खाली...

पुढे जाताना फक्त एकदा मागे वळून पाहिलं तेंव्हा दिसला...
एक सोनेरी तुकडा,
कुठल्याश्या गडद पडद्याच्या फटीतून 
आत झिरपताना...

___ जुई

Wednesday, March 2, 2011

किंकर जी

        पूर्वी किंकर नावाचे एक गृहस्थ आजोबांना भेटायला यायचे अधून मधून... ते ही वयानी आजोबांच्या एवढेच असतील. आम्ही त्यांना किंकर जी म्हणायचो. बिहार मधल्या  मंदार पर्वताच्या पायथ्याशी यांचं सीमा नावाचं गाव. आजोबांसारखे ते ही खादी च्या संस्थेशी निगडीत. भरपूर प्रवास करायचे. ते पुण्यात आल्यावर आम्हाला घराचा जिना चढतानाच कळायचं की किंकर जी आलेत... सरसो (सरसो म्हणजेच मोहोरी) तेलाच्या वासावरून.... (?) ! डोक्याला, अंगाला रोज न चुकता सरसो चं तेल लावायची त्यांना सवय होती... एवढंच काय सरसो-तेलाच्या वासाच्याच साबणानी ते कपडे धुवायचे. आले की ४-५ दिवस मुक्कामासाठीच यायचे... आमच्या कपाळाला आठ्या यायच्या. आज्जी च्या चेहऱ्यावरचा वैताग तर बघण्यासारखा असायचा. तिचं नाक जरा जास्त तिखट होतं. कोणताही वास तिला पटकन यायचा आणि न आवडणारा वास असेल तर तिला अगदी नको-नको होऊन जायचं. ते परत गेले की आज्जी घरातले सगळे कपडे धुवायला काढायची... अगदी चादरी, अभ्रे, पडद्यांसकट... !


             तर असे हे किंकर जी... अंगानी चांगले सुधृढ ... सरसो च्या कृपेमुळे डोक्यावर या ही वयात भरपूर बाल-सेना :) पांढरा सैलसर झब्बा आणि तसाच ढगाळ पायजमा... बरोबरचं समान सुद्धा ऐस-पैस. चेहऱ्यावर कायम (एक तेलकट थर आणि ) एक उगाच हसू. एकदा आले की त्यांच्या खास उत्तर भारतीय मिठास वाणीने सगळ्यांचं कौतुक करतील.... गोड बोलून अक्षरशः दिल जीत लेतील वगैरे... कितीही आमंत्रण दिलं तरी तुम्ही आमच्या कडे येत नाही म्हणून लटके रागावतील. 'अरे ओ बिटिया.... दादाजी की लाडली है ना?' ... असं म्हणत माझ्या हातावर खाऊ चा पुडा ठेवतील... शक्यतो त्या पुड्यात पेठा असेल. आणि क्वचितच मिळणारा हा खाऊ चाखून आम्ही हमखास खुश होऊन जाऊ... मग आजोबांशी मोठमोठ्या आवाजात संस्थेतल राजकारण बोलत बसतील. आमच्या इमारतीमधल्या सगळ्या १४ घरांना खडा न खडा ऐकू जाईल असं घडाघडा बोलणं. तशी यांची खडाजंगी पहाटेपासूनच सुरु होईल... पहाटे ४ वाजता मोजून ४० वाटणे भिजत घालतील...दिवा  लावल्याने झोपमोड होऊ नये म्हणून अंधारात  आणि मोजता यावे म्हणून  स्टील च्या भांड्यात सुमारे २ वीत उंचीवरून एक एक वाटणा मोजत टाकतील.. टण टण टण.... ते भिजवलेले वाटणे रोज न चुकता खायचे. मग प्राणायाम करायचा चांगला तासभर.. मग अंघोळीची तयारी... ती सर्वांगाला सरसो-भिषेक करूनच! त्यांचा कसं... सगळं जाहीर. छुपं काही नाही. घरात असतील तोपर्यंत दृक-श्राव्य-वासिक (?)  अश्या सगळ्या माध्यमातून जाणवत राहतील. तशी किंकर जींची आम्ही कितीही चेष्टा केली तरी त्यांच्या कामाबद्दल भरपूर आदरही होता. किंकर जींनी त्यांच्या तैल-बुद्धी नी ध्येयवादी योजना आखून उत्तर भारतातलं एक पूर्ण गाव स्वावलंबी करून दाखवलं होतं. बाहेरच्या कोणत्याही गावाची, शहराची मदत नाही मिळाली तरी अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी कोणावर अवलंबून रहायची गरज त्या गावावर पडणार नव्हती. गावातली एकही व्यक्ती बेरोजगार नव्हती आणि एकही संसार खायची भ्रांत पडून काळजीनी  सुकलेला नव्हता.  स्वतःच्या आयुष्यात सुद्धा पूर्ण स्वावलंबी असलेले, स्वतःचे कपडे स्वतः कातलेल्या सुताचेच वापरणारे असे मनस्वी होते किंकर जी ...
           नंतर त्यांच्या पुण्याला चकरा कमी कमी व्हायला लागल्या. पत्रं मात्र नियमित यायची. खालच्या पोस्टाच्या पेटीतून मी आमची पत्र गोळा करताना त्यांचं पत्र हातात यायचं तेंव्हा त्याच्या किंचित ओशट-तेलकट स्पर्शावरूनच कळायचं त्या पत्राचा प्रेषक कोण आहे ते. मी उत्साहानी पळत पळत जाऊन पत्र आजोबांच्या हातात द्यायचे. उत्साह एवढ्याच साठी की किंकर जींच नाव घेताच आज्जी काही ना काही तरी टोमणा मारायची आणि मग आज्जी-आजोबांमधली टोलवा-टोलवी  बघायला आम्हाला जाम मजा यायची. आजोबा मधेच वाचून दाखवायचे की 'आयुष्मती बिटिया को बहोत सारा प्यार' असं लिहिलंय ग तुझ्या साठी. पण पत्राचा शेवट वाचेपर्यंत आजोबांचा चेहरा पडत पडत जायचा. नंतर नंतर आज्जी सुद्धा दबलेल्या आवाजात विचारायची " जास्ती आहे का हो त्यांचं? बघून या हवं तर एकदा." 

            आता आज्जी नाही. आजोबा ही गेले. किंकरजींचं पुढे काय झालं कोणास ठाऊक? काही कळावं म्हणून पुढाकार घेऊन काही केलंही नाही. त्यांना किंवा त्यांच्या पत्राला शेवटच बघूनही आता बरीच वर्ष झाली. आज दुकानात चुकून हाती आलेल्या सरसो तेलाच्या बाटली वरून त्यांची आठवण आली. आणि आता आठवण आली आहे तर ती जाता जात नाहीये. छळते आहे. 

             जेंव्हा किंकर जी आणि आजोबा त्यांच्या कामाविषयी चर्चा करायचे तेंव्हा त्यांना अक्षरशः स्थळ-काळाचं भान उरायचं नाही. कधी कधी आज्जी ही गंभीरपणे  त्यांचं बोलणं ऐकत, मध्येच एखादा मुद्दा मांडत तिथेच बसून रहायची. सगळं तारुण्य स्वातंत्र्यासाठी खर्ची घातलेली आणि मग बाकीचं आयुष्य गांधी आचार-विचार आणि खादी चा प्रचार-प्रसार करण्यासाठी वाहून टाकलेली ती तीन पिकलेली माणसं त्या ही वयात कोणत्या ध्येयानी भारावून बोलायची? वाद घालायची? तेंव्हा त्यांचं बोलणं सगळं कळण्याएवढी  मी मोठी नव्हते. पण त्या बोलण्यातली कळकळ  मात्र जाणवायची. आता खूप ओढ लागते हे जाणून घेण्यासाठी की कुठून एवढी उर्जा त्यांनी मिळवली होती? आत्ता आपण जे काम करतोय तसं वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा तेवढ्याच उत्साहानी पेटून करू शकू का असा विचार माझ्या मनात आला. तेंव्हाचा काळही वेगळा होता आणि प्रश्नही वेगळे होते. त्यांना जे पटलं होतं ते काम त्यांनी आयुष्यभर निष्ठेनी केलं. आपण करत आहोत ते काम किती गरजेचं, महत्वाचं आणि उपयुक्त आहे याची दृष्टी त्यांना होती. पैसा कमीच मिळाला पण बहुदा समाधान आणि काही तरी करून दाखवल्याची भावना मात्र अनिवार मिळवली. आताच्या काळात पैसा, नाव मिळवण्याचं ध्येय ठेवण्यात काही चूक नाही. आपणही काही तरी सामाजिक कामच आयुष्यभर केलं पाहिजे असंही म्हणणं सार्थ नाही. पण निदान स्वतःला अतिशय पटणारं, आवडणारं आणि ज्यातून काम केल्याचं समाधान मिळेल असं काही तरी केलं पाहिजे असं म्हणण्यात काही वावगं नाही ना? 

            मी ती सरसो तेलाची बाटली विकत घेतली... आणि घरी येऊन ती स्वयंपाक घरात न ठेवता बाहेरच्या शो-केस मध्ये कोपऱ्यात ठेवून दिली. मला ती अधून-मधून दिसत राहील आणि बळ देत राहील. किती तरी लोकांच्या आयुष्याला किंकर जींनी परीस-स्पर्श केला होता.... आणि उशीराच का होई ना आज त्यात अजून एक भर पडली होती.

  - जुई