Monday, March 21, 2011

तुकडे

खिडकीवर सारलेल्या गडद पडद्याच्या फटीतून  
एक कोवळी तिरीप पाझरली 
आणि तुझ्याशी ओळख झाली 
त्या सोनेरी तुकड्यामुळे  ...

नंतर मग ...
वेगवेगळ्या झरोक्यातून, खिडक्यांतून, दारातून
आत आलेले ते पिवळे, निळे, राखाडी, सप्तरंगी तुकडे 
माझ्याशी लपा-छपी खेळत राहिले...
भिंगातून संकोचलेले...
गजांमध्ये दुभागलेले...
डबक्यामध्ये विरघळलेले ...
चष्म्याच्या आड काळवंडलेले ...
फाटक्या छपरातून सांडलेले...
असंख्य तुकडे.

अश्या तुकड्या-तुकड्यांमधून हुलकावणी देणारा तू 
आणि ते झेलताना भान हरपलेली ध्यासवेडी मी...
कधी त्यातून तुझं चित्र  साकारतंय का बघणारी,
कधी त्यात तुझं प्रतिबिंब उमटतंय का याची वाट पाहणारी,
कधी त्यातून तुझी मूर्ती घडतीये का शोधणारी...

जसजसे तू उधळत असलेल्या तुकड्यांचे रंग होऊ लागले गडद ...
आणि कंगोरे अधिक बोचरे,
तसतशी मी शहाणी होत गेले...
कितीही सांधले तरी तुझं आदिम, अनंत रूप त्या तुकड्यात थोडंच भेटणार होतं मला...
ते झेलण्यासाठी त्यांच्या मागे धावताना मला माझी वाट मात्र सापडली.
मग तुझी निशाणी म्हणून त्यातला एक पारदर्शी तुकडा डोळ्यात बसवून घेतला, 
आणि बाकीचे सोडून दिले ओंजळीतून खाली...

पुढे जाताना फक्त एकदा मागे वळून पाहिलं तेंव्हा दिसला...
एक सोनेरी तुकडा,
कुठल्याश्या गडद पडद्याच्या फटीतून 
आत झिरपताना...

___ जुई

2 comments:

  1. या मुलीचं लेखन दिवसेंदिवस जास्त जास्त परिपक्व होत चाललंय... :)

    फारच अप्रतीम कविता लिहीलीयेस... Keep it up आणि मुक्तछंदातल्या काव्यविलासासाठी तुला ऑल द बेस्ट! :)

    ReplyDelete
  2. Extremely intense and deep meaning writing. Nice.

    ReplyDelete