Thursday, September 18, 2014

अपेक्षा

अपेक्षा 

जगाच्या आपल्याकडून 

काही स्वतःच्या स्वतःकडून … 


म्हणजे तसा जर सुटा सुटा विचार केला तर....

मला आवडेल मी खूप प्रसिद्ध झाले तर

मला आवडेल माझं फर्स्ट क्लास करिअर झालं तर

मला आवडेल मी एखाद्या कलेत प्रभुत्व मिळवलं तर

मला आवडेल मी प्रेमळ, गुणी बायको झाले तर

मला आवडेल मी झकास स्वयंपाक करणारी सुगरण झाले तर

मला आवडेल मी आदर्श आई झाले तर

असं बरंच काही मला आवडेल...


पण हे सगळं रोजच्या रोज मला आवडेल ? जमेल ? 


कारण खरं तर मला व्हायचंच नाहीये सुपर वूमन 

I am happy being human...

- Jui

Sunday, August 4, 2013

आनंदाचं बीज

इमारतीत नवीन बिऱ्हाड नुकतंच आलं होतं... सगळ्यात वरच्या मजल्यावर. तसे चारच मजले होते पण लिफ्ट नसल्यामुळे चार मजले चढून जाण सगळ्यांच्याच जीवावर यायचं. नवीन येणाऱ्या बिऱ्हाडात मध्यम वयीन नवरा-बायको, त्यांचा तरुण कमावता मुलगा आणि कॉलेजमध्ये शिकत असलेली मुलगी होती. सामानाचा टेम्पो खाली उभा होता. पलंग, कपाट वगैरे वस्तू जिन्याचे कोन-कोपरे सांभाळून वर चढवणं चालू होतं. मुलगी या सामानाच्या स्थलांतराकडे लक्ष देत होती. आम्ही तळ-मजल्यावर राहत असल्यामुळे आमच्या दारावरूनच सगळी ये-जा चाललेली... मी त्या वेळी ७-८ वर्षांची असेन. मी शाळेचा गृहपाठ करत बसले होते आणि आई वर-वरची कामं करत होती. काही वेळानी दार वाजवून ती आत आली. "काकू थोडं पाणी देता का? फारच धाव-पळ चाललीये ना...   काही कागद-पत्रांच्या कामासाठी दादा आणि बाबा बाहेर गेलेत, आई वरती घरात आणि मी पण वर गेले तर सामानाकडे कोण बघणार? पण आता उन्हात थांबून फारच तहान-तहान होतंय म्हणून म्हटलं तुम्हालाच पाणी मागावं.  आणि मी अजून ओळख नाही ना करून दिली? मी शर्मिला. शर्मिला पाटील. आम्ही इथे वर राहायला आलोय. आमचं आधीच घर फारच लांब होतं. मला कॉलेजला आणि शशांक दादाला त्याच्या ऑफिसला जायला खूपच गैरसोयीचं होतं. इथे एकदम मोक्याच्या जागी आता आलोय तर खूप छान वाटतंय. काकू पाणी मस्त गार आहे ... माठातलं आहे का? वाळ्याचा वास येतोय छान. एका जग मध्ये अजून देता का? सामान चढवून हे लोक पण दमले असतील.. त्यांना देऊन येते." आईला काही बोलायची संधीही न देता धांदलीत बाहेर गेली. ती आमची शम्मी-ताईशी झालेली पाहिली भेट. दिसायला चार-चौघींसारखी, उंचीला बेताची, रंग सावळा पण एकदम लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे मोत्यासारखे दात आणि निखळ हास्य... जे बघून आपल्याही चेहऱ्यावर अनाहूतपणे स्मित तरळून जावं.

नंतर पाण्याचा जग परत द्यायला आली आणि तासभर गप्पा मारत बसली. माझ्याशी पण शाळेतल्या गमती सांग, एखादा बैठा खेळ शिकव किंवा मैत्रिणींची नावं विचार... वगैरे बोलत होती. माझा छोटा भाऊ २ वर्षाचा होता. तो दुपारची झोप संपवून उठल्यावर तर त्याला सोडेच ना... " काकू, मला ना लहान मुलं फार आवडतात. जुन्या घराच्या जवळ पण एक छोटी मुलगी रहायची .. मी तिला रोज घरी खेळायला घेऊन यायचे. ह्याला पण अधून मधून खेळायला घेऊन गेले तर चालेल का? फारच गोड आहे हा. इथे याच इमारतीत आणखी लहान मुलं पण आहेत का? मगाशी खेळताना दिसली होती बाहेर. व्वा.... मजा येणार या घरात. अजून आम्ही सामान लावतोय पण मला आत्ताच आमचं हे नवीन घर फार आवडायला लागलंय. "

 
आणि मग बघता बघता शम्मी ताई अगदी घरचीच होऊन गेली... रोज १-२ वेळा तरी चक्कर असे. सकाळी लवकर कधी आली तर म्हणे " छोटूचा एक शिळा पापा घेऊन जाते... मग त्याची अंघोळ झाली कि ताजा पापा घ्यायला पुन्हा येईन." उत्साह मावळलेला कधी दिसायचाच नाही. दिवसभर कॉलेजमध्ये जाऊन आली तरी संध्याकाळी, रात्री अगदी तरतरीत... आमच्याशी दंगा करायला तयार. माझ्या भावाला काही तिचं शर्मिला हे नाव म्हणता यायचं नाही म्हणून तो तिला शम्मी ताई म्हणायचा आणि तेंव्हापासून ती सगळ्यांचीच शम्मी ताई झाली होती.  इमारतीतल्या सगळ्या लहान मुलांनाही चटकन तिचा लळा लागून गेला. सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळायचा बेत आखला कि शम्मी ताई त्यात आहेच... दिवाळीचा किल्ला करायला शम्मी ताईची धावपळ सुरु... रविवारी सगळ्यांना घेऊन टेकडी किंवा पर्वतीवर घेऊन जायला शम्मी ताई तयार... गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवणे, बाल-नाट्याला घेऊन जाणे या पण तिच्या आवडीच्या गोष्टी.

तिची आई कधी कधी माझ्या आईशी गप्पा मारताना कौतुक मिश्रित तक्रार करे ' बघा हो.. एवढी मोठी झाली तरी हूडपणा काही जात नाही अंगातून. आता लहान पोर का आहे? पण रमतेच फार लहान मुलांत. जीव लावून असतात लहानगेही ... म्हणून काही म्हणवत नाही. तसं काहीच वाईट करत नाही पण कधी तरी मोठं व्हावंच लागेल न.. किती दिवस खेळत बसता येणार आहे असं? " तिच्या आईचं बोलणं तेंव्हा कानावर पडलं तरी समजलं नव्हतं. पण जेंव्हा शम्मी ताईचं लग्न ठरलं तेंव्हा आता ती सोडून लांब जाणार याची जाणीव झाली. शम्मी ताई लग्न होऊन औरंगाबादला निघून गेल्यावर बरेच दिवस कोणालाच करमले नाही. सारखीच तिची आठवण येत होती. पण हळूहळू सगळे आपापल्या व्यापात गुंतले. अधून मधून विषय निघत राहिला पण सगळ्यांनी तिचं नसणं स्वीकारलं होतं. लहानग्यांना जास्त दिवस तिची कमी जाणवत राहिली एवढंच. एखाद्या वर्षात तिच्या घरचेही दुसरीकडे राहायला गेले आणि शम्मी ताई कधी माहेरी आली कि भेटेल याही शक्यतेला पूर्णविराम मिळाला. 

त्या नंतर खूपच म्हणजे ९-१० वर्षांनी एका दुपारी दारात शम्मी ताई हजर !! केसांत १-२ रुपेरी तारा, सराईतपणे चापून नेसलेली साडी आणि चष्मा सोडल्यास बाकी काहीही फरक नाही. तेच निखळ हसू चेहऱ्यावर आणि आनंदाचा झरा डोळ्यात. सगळ्यांना अगदी घट्ट भेटली आणि नेहेमीसारखी तिने बोलायला सुरुवात केल्यावर आम्हाला काही म्हणायची संधीही दिली नाही. आई बाबांची चौकशी केली, मी किती मोठी झालीये यावर आश्चर्य दाखवलं शेजारच्या काकुंविषयी विचारलं. आता ती रहायची त्या घरात कोण राहतंय विचारलं...आणि माझ्या छोट्या भावाला भेटायला आतूर झाली. पण आईनी तिला जरा शांत केलं .. म्हणाली 'अगं, तू जराही बदलली नाहीस. जरा दम धरशील कि नाही? तो येईल क्लासहून एवढ्यात पण अगं तू इथे राहायचीस तेंव्हा तो फारच लहान होता... २-३ वर्षांचा. एवढ्या लहान वयातलं नाही आठवत कधी कधी ... तर तू काही मनाला लावून घेऊ नकोस जर त्याने पटकन ओळखलं नाही तर. तसं होणं साहजिक आहे म्हणून सांगितलं ... तू आता बस जरा आणि तुझ्याविषयी तर सांग. कशी आहेस? कुठे.. औरंगाबादलाच असतेस का? घरचे कसे आहेत? " आईचं बोलणं ऐकून शम्मी ताईच्या चेहऱ्यावर एक अनामिक भाव तरळून गेला जो बघून तेवढ्या क्षणापुरती हि आपली शम्मी ताई नाहीच. कोणी वेगळीच शहाणी, विवेकी, मोठी बाई आहे असं वाटून गेलं. जोराची सर येऊन गेल्यावर जसा नंतरचा पाऊस समाधानी बरसत राहतो तशी ती आता वाटायला लागली. आम्हाला एवढ्या वर्षांनी भेटून झालेला आनंदाचा पहिला जोर कमी झाला आणि आरामशीर बसून ती बोलायला लागली.
" काकू, किती वर्ष झाली न आपल्याला भेटून. लग्नाआधीचं जग एकदम वेगळंच असतं ना? फार जुन्या, स्वप्नासारख्या वाटतात मला त्या गोष्टी. मी लग्न होऊन गेले न सासरी तेंव्हा एवढी भीती वाटत होती कि कसे असतील लोक, नवरा समजून घेईल कि नाही? नवीन घर, नवीन शहर... डोळ्यासमोर एकही ओळखीचं माणूस नाही. पण खरं सांगू.. हि सगळी भीती अनाठाई होती. खूपच प्रेमळ लोक आहेत हो सगळे. आणि मोठ्या दिरांची एक छोटुकली पण होती ना घरी. मग तर काय आमची गट्टीच जमली होती. काही महिन्यात दीर पुण्याला आले नोकरी-निमित्त आणि मग घरी मला करमेना. आम्ही तेंव्हा मग घरात आपलं छोटं कुणी आणावं असं ठरवलं पण कसं असतं बघा. मला मुलांची एवढी हौस पण एका तपासणीतून कळलं कि मला कधी मूल नाही होऊ शकणार. मी अगदी तुटून गेले हे ऐकल्यावर. दुसऱ्या घरच्या कुणी मलाच बोल लावले असते पण घरच्यांनी समजून घेतलं. अडचण हीच होती कि मीच ही गोष्ट पचवू शकत नव्हते. आधी स्वतःला, नवऱ्याला... मग नशिबाला, देवाला.. सगळ्यांना दोष देऊन झाला... मनाची खिन्नता कित्येक दिवस गेली नाही. उदासपणे घरात या खोलीतून त्या  खोलीत हिंडत राहायचे. काहीच करायला उत्साह वाटायचा नाही. सगळ्या गोष्टी निरर्थक वाटू लागल्या. पण माझ्या नवऱ्याने खूप साथ दिली. मला हि गोष्ट किती लागलीये हे तो समजून होता. त्यानेच मग मला दत्तक मूल घेण्याविषयी सुचवलं. आम्ही एका अनाथाश्रमाला भेट दिली आणि तिथे गेल्यावर मला एकदम जाणवलं कि माझी आणि या किंवा अश्या मुलांची जोडी खरं तर उत्तम आहे. त्यांना प्रेम करणारं, जपणारं कोणी हवं आहे आणि मला माझ्या प्रेमाचा घडा कोणावर तरी रिता करायची इच्छा आहे. आणि मग एकानंतर एक गोष्टी घडत गेल्या आणि एखादं मूल दत्तक घेण्याऐवजी आम्ही एक अनाथाश्रमच दत्तक घेतलं असं म्हणूया. सुदैवाने सुरुवातीला पदरचे घालून आणि नंतर मिळालेल्या देणग्यांच्या, ट्रस्टच्या मदतीनी उत्तम चालू आहे. मला कोणी विचारलं कि तुम्हाला किती मुलं -बाळ ? तर मी म्हणते सध्या ३५ आहेत पण कदाचित पुढच्या महिन्यात २-३ अजून होतील! आम्ही अनाथाश्रम असं नाही म्हणत तर प्रेमालय असं नाव दिलंय संस्थेला. त्याच संदर्भात एका कामासाठी इथे जवळ आले होते म्हणून म्हटलं भेटून जावं "
आम्ही सगळे हे ऐकून स्तब्ध झालो होतो. आईला तिचा खूप अभिमान वाटला, कौतुक वाटलं. काय बोलू आणि काय नाही असं तिला झालं होतं तेवढ्यात माझा भाऊ क्लासहून आला आणि त्यानी शम्मी ताईला ओळखलंही... तेंव्हा असं वाटून गेलंच कि कुणी ओळखलं नाही हे मनाला लावून घेण्याच्या पार गेली आहे ही. एखाद्या दुःखाचा डाग जपून ठेवण्याऐवजी त्याच्या कोंदणात नवीन आनंदाचं बीज कसं फुलवावं हे हिच्याकडून शिकलं पाहिजे. मी तिच्याकडे वेगळ्याच भारलेल्या नजरेनी बघत होते आणि ती आपली हे सांगण्यात गुंतली होती कि तिच्या मुलांपैकी एक अगदी माझ्या भावासारखा दिसतो आणि फक्त तो तिला कसं शम्मी-आई म्हणतो! 

Tuesday, September 18, 2012

आहेस...वाटलं होतं 
सोडून जाशील तेंव्हा 
केवढा हलकल्लोळ माजेल 
माझ्या चिमुकल्या आभाळात

वाटलं होतं 
मी त्या प्रसंगाला तोंडच नाही देऊ शकणार

वाटलं होतं 
हे होणार माहित असूनही 
बसलेल्या त्या धक्क्यातून 
मी नाही स्वतःला सावरू शकणार 

पण तसं झालं नाही ...


लहानपणी तू सांगायचीस 
त्या गोष्टींमधले अर्थ उमगले मला अचानक 

जसा चेटकिणीचा जीव पोपटाच्या डोळ्यात असायचा
तसा .. खरं तर तुझा जीव माझ्या आठवणीत आहे
मी आहे .. तोपर्यंत तू आहेसच 

मागच्या श्रावणात तू मला दिलेलं अत्तर 
सगळ्यांना गंधवेडं करून आज संपलं
पण माहित आहे? 
अत्तराचा जीव सुद्धा त्याच्या कुपीत असतो

ती कुपी आता जपून ठेवीन 
ती आहे... तोपर्यंत तो गंध आहे ... आठवणी आहेत... तू ही आहेस...

__________ जुई 

Monday, March 12, 2012

पोरकेपणपायातलाच चिरा ढासळल्यावर 
आधाराच्या भिंतीही पोरक्या झाल्या
आधी छत चंद्रमौळी होते
आता तारकाच कौलारू झाल्या 

बंधाराच फुटून गेला तर 
वाहणाऱ्याला काय त्याचे?
इकडे उरली व्याकूळ तहान 
तिकडे कल्लोळत पूर नाचे 

थेंबभर मनात झालीये अगदी  
आभाळभर प्रश्नांची दाटी
आता फिरतेय शोधत उत्तरं
शिदोरीत बांधून मुळातली माती 
________ जुई 

गाठी

(गुलझार यांच्या 'जुलाय्हा' या कवितेवरून प्रभावित )

हाताशी मोकळा वेळ असला की मी आठवणींचा गुंता समोर घेउन बसते 
एक एक गाठ सोडवताना 
कित्येक धरून ठेवलेली, निसटून गेलेली माणसे भेटतात 
काही लक्ख, काही धूसर प्रसंग आठवतात  
तोपर्यंत दुसरीकडे पुन्हा गुंता झालेला असतो.
एकदा मात्र एक सुट्टे टोकच लागले हाताला 
त्याला धरून मागे जाता जाता त्याच्या दुसऱ्या टोकाशी तू भेटलास
मागे एकदा असंच एक टोक स्वतःकडे ठेवून, 
मध्ये घट्ट गाठ बांधून, दुसरं टोक माझ्याकडे दिलं होतंस.
म्हणाला होतास "गाठी या वरतीच बांधलेल्या असतात!
असेल आपली पक्की तर टिकेल"
नंतर आपापल्या मार्गांनी जाताना ...
दोन्हीकडून ओढ बसायला लागली.
पण त्यामुळे मधली गाठ अजूनच घट्ट झाली का?
कदाचित हो.... कदाचित नाही...
आपापल्या टोकाशी झालेला गुंता सोडवताना 
दोघांनाही बहुदा ,
मागे वळून पुन्हा त्या गाठीकडे बघण्याचं धैर्य झालं नाही 
आता फक्त सुतासारख्या सरळ तुझ्या आठवणीच तेवढ्या उरल्या 
_________ जुई 

Monday, January 30, 2012

एकेका लग्नाची गोष्ट !


लग्न मंडप सजला आहे. फुलांच्या माळा सगळीकडे सोडलेल्या आहेत. मुहूर्ताची वेळ यायला अजून थोडा अवकाश आहे. जवळ जवळ ४००-४५० आप्त-स्वकीय-मित्र मंडळींनी सभागृह फुलले आहे... भरजरी, सोनसळी भपक्याने नटले आहे. एकीकडे जेवणाच्या हॉलमध्ये नंतरच्या भोजनाची तयारी जोरात चालू आहे. बाहेर वधु-वरांना घेऊन जाण्यासाठीची गाडीही दिमाखाने सजली आहे. रुखवतावर उंची वस्तू, कलाकृती वगैरे कलात्मक रित्या मांडून ठेवल्या आहेत. वधूपिता सगळी व्यवस्था चोख होते आहे ना हे बघण्यात मग्न आहेत. नवरा मुलगा - परदेशस्थ, हुशार, देखणा.. मित्र मंडळींच्या गरड्यामध्ये वेढलेला आहे. इकडे करवल्या विचार विनिमय करताहेत ... नवऱ्या-मुलाचे बूट कसे पळवता येतील या विषयी. वरमाई कौतुकाने सगळीकडे मिरवते आहे आणि वधूची आई हलल्या काळजानी पुढच्या विधीच्या तयारीला लागली आहे. 

या सगळ्या धामधुमीत, सभागृहात मांडलेल्या खुर्च्यांच्या दुसऱ्या रांगेत वधूचे आज्जी-आजोबा बसले आहेत. खरं म्हणजे इतर सगळ्या गोंधळामध्ये त्यांची उठ-बस नको म्हणून त्यांना तिथे बसवले गेले आहे. आज्जींच्या मनात चाळवा -चाळव चालू झाली आहे. 'एकदा अक्षत पडली की पोरीला दोन क्षण सुद्धा मोकळे मिळणार नाहीत. आणि मग सासरी जाईल, भुर्रकन परदेशातही निघून जाईल नवऱ्याबरोबर .. मग कशी आपल्याला भेटणार? ' नातीशी चार शब्द बोलायची, तिला प्रेमानी जवळ घेऊन तोंडभर आशीर्वाद द्यायची आज्जींना तीव्र इच्छा होते. त्या खुर्च्यान्मधून वाट काढत काढत हॉल मधल्या वधु-पक्षाच्या खोली कडे निघतात. ' नातीची तयारी चालू असेल आत. साडी नेसायची सवय नाही.. आज दिवसभर तो जड शालू कसा सांभाळणार ? ' असा विचार करत त्या आत जाणार तेवढ्यात एक बाई खोलीचं दार बंद करत म्हणते, ' नवरीचा मेक-अप चालू आहे ... आता प्लीज तिला कोणी डिस्टर्ब करू नका." दार धाडकन बंद होतं आणि आज्जींच्या मनात एक आठवणीची खिडकी उघडते ... त्यांच्या स्वतःच्या लग्नाची आठवण!

साल: १९४८
वेळ: साधारण हीच
स्थळ: खुन्या मुरलीधर मंदिर, पुणे 

मंदिराच्या प्रशस्त आवारात लग्नाची तयारी चालू आहे. मोजक्याच आप्त आणि मित्र मंडळीनी आवर फुलले आहे. लग्नाचे जेवण म्हणून अवघ्या २५ पानांचा स्वयंपाक पाठीमागे चालू आहे. २१ वर्षांचा नवरा-मुलगा. खादीचा शुभ्र पायजमा आणि खादी सिल्कचा शर्ट अंगात. मुलाच्या घराची अशी ५-६ च माणसे. १७ वर्षांची नवरी मुलगी. पुण्यात नातेवाईकांकडे राहणारी. वडील नाहीत आणि आई, भावंडे लांब नागपूरला. 'मुद्दाम कर्ज काढून लग्नाला येऊ नकोस. नंतर पाया पडायला आम्हीच येऊ' असे मुलीने आईला कळविले असल्यामुळे मुलीकडचे पुण्यातले नातेवाईक तेवढे लग्नाला हजर. अशी परिस्थिती  असताना जमेल तेवढाच माफक शृंगार मुलीनी केला आहे... नवी साडी, गजरे, हातात हिरव्या बांगड्या आणि मुंडावळ्या. पण या तरुण वयातही असलेला समजुतदारपणा, विचारी स्वभाव, आत्मविश्वास आणि पुढच्या आयुष्याविषयीची स्वाभाविक उत्सुकता या सगळ्याच्या मिश्रणातून एक वेगळेच तेज चेहऱ्यावर झळकते आहे. 
मागच्या वर्षीच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मुलाच्या व त्याच्या घरच्यांच्या स्वातंत्र्य-चळवळीतील सहभागाचा आणि सुधारक, पुरोगामी विचारांचा प्रभाव समारंभावर पडलेला जाणवतो आहे. मानापानाची, देवाण-घेवाणीची प्रथाही इथे न पाळल्यामुळे समारंभाला वाद-विवादाची झालरही नाही. अगदी जवळच्या लोकांसमवेत दोघांनी एकत्र जीवन फुलविण्याची सुरुवात करण्याचा साधा-सोपा सोहळा. कुठलाही आवेश, दिखावा नाही. तशी मानसिकताही नाही.
मंदिराचे भटजी आता पुकारा करीत आहेत... सांगत आहेत की 'सगळी तयारी झाली, मुहूर्त घटिका आली. अंतरपाट कोण धरेल?' त्याच बरोबर बाहेर श्रावण सरींनीही हजेरी लावली आहे. मोजके ५ विधी, हारांची देवाण-घेवाण आणि नवऱ्या-मुलाने वधूच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत घालताच सुमंगल लग्न - सोहळा पार पडलेला आहे. येणाऱ्या सुख, दुःख, कष्ट, आनंद सगळ्यासामावेत पुढच्या आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ लाभल्याचा अपार, निर्भेळ आनंद दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडतो आहे. 

"आज्जी.. आज्जी अगं आत ये ना... " हाक ऐकून आज्जी भानावर येतात. नात दार उघडून बाहेर येते आणि आज्जींना हाताला धरून आत घेऊन जाते. 'अगं तयारी एकीकडे होत राहील. अजून थोडा वेळ आहे. मला तुझ्याशी पुन्हा इतक्यात असं बोलायला कधी मिळणार? मला माहितीये तू माझी काळजी करत असणार... पण नको करूस. परदेशात गेल्यावरही मला माझं काम, घर सगळं येईल सांभाळता आणि आम्ही दोघं मिळून करू गं व्यवस्थित मॅनेज. शेवटी मी तुझीच नात आहे :) आता तू आणि आजोबा मात्र तब्येतीची काळजी घ्या. माझं तिकडे सगळं सेट झालं की मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे काही दिवस. माझा संसार बघायला येशील ना? " नातीचे डोळे उत्साहानी चमकतात. चेहेऱ्यावर मेक-अप चा लेप असला तरी डोळ्यातले भाव तसेच असतात. समजुतदारपणा, आत्म-विश्वास, आनंद, उत्साह तोच. आज्जींच्या मनात येते की तीन पिढ्यांच्या काळात परिस्थिती किती बदलली.. सुबत्ता आली. सगळ्या हौसा-मौज पुरवता येण्या इतकी संपन्नता आली. भपका आला... दिखावा आला... पण जेंव्हा नवरा-नवरीच्या चेहऱ्यावर असाच निर्भेळ, अपार आनंद झळकतो... त्यांनी एकमेकांना प्रेमानी, विश्वासानी स्वीकारल्याचं जाणवतं तेंव्हाच खरं सगळं सुमंगल होतं. बाकी इतर कशाला काही महत्त्वं नाही. 
नातीच्या डोक्यावर त्या हात फिरवून 'सुखी रहा' म्हणतात आणि सोहळा जणू आत्ताच पार पडल्याच्या आनंदात बाहेर येऊन आजोबांच्या शेजारी बसतात.

- जुई  

Thursday, December 8, 2011

तो येतो आणि...

आधी कळवतो की 'येईन'
आपणही तयारी करतो त्याच्या स्वागताची
पण त्याच्या शब्दावर विश्वास कसा  ठेवावा?
वाट बघण्यातच आपले चार दिवस निघून जातात
रोजची कामं आपण सुरळीत चालू करतो
आणि मग अचानक, एखाद्या सकाळी सकाळी
दाणकन येतो सगळ्या लवाजम्या सकट
अंगणात, घरात, झोपेत, मनात, विचारात असा शिरतो...
आणि सगळीकडे पसारा करून ठेवतो.
आपली कमालीची धांदल उडते
पण तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

झाडांच्या डोक्यावर टपली मारून त्यांची पानं-फुलं खाली पाडतो
वाफे-आळी मोडून लहान लहान ओहोळांना पकडा - पकडी खेळायला सोडून देतो
पागोळ्यांची माळ तोडून ओसरीवर मोती पसरवून ठेवतो
मातीचा रंग अंगणभर सांडून ठेवतो
छपरावर नाचून नाचून अगदी गोंगाट माजवतो
तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

दाराला लावलेले उबेचे पडदे विस्कटून घरभर गारवा पसरून ठेवतो
आल्याचा चहा आणि कांदा भजीच पाहिजेत असा हट्ट करत,
स्वयंपाकघराच्या खिडकीत ठाण मांडून बसतो.
गौड मल्हार, मेघ, मिया मल्हार... सगळ्यांचे सूर एकच वेळी उधळायची घाई करतो
सगळ्या कामांना बुट्टी देऊन त्याच्याबरोबर भटकायला जायची गळ घालतो
तुषार, चैतन्य, प्रफुल्ल, हर्ष अश्या ढीगभर मित्रांना गोळा करून नुसता दंगा घालतो
तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

कपाटात कोंबलेल्या सगळ्या निळ्या- हिरव्या आठवणी खसकन बाहेर ओढून काढतो
लहानपणी दोघांनी मिळून सोडलेली होडी कुठपर्यंत पोचली विचारत राहतो
त्याच्या आणि माझ्या हातात हात गुंफून काही काळ नाचलेल्या त्या तिसऱ्याची चौकशी करतो
फक्त त्यालाच सांगितलेली गुपिते फोडायची धमकी देतो
दिवसभर भंडावून सोडल्यावर पुन्हा रात्री स्वप्नात येऊन चिडवत राहतो
तरीही त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...


माझ्या चिमुकल्या अंगणात उत्साह भरून जातो...
माझ्या एकट्या घराला जिवंत करून जातो...
माझ्या व्याकूळ मनाला सोबत करून जातो...
सांगून जातो की पुन्हा येईन,
पण त्याच्या शब्दावर विश्वास कसा ठेवावा?


_ जुई