Tuesday, February 22, 2011

प्रचीती



जेंव्हा पांघरली जराशी, कृष्ण मेघांची दुलई...
गेली चटका देऊन, तप्त विजेची सळई

जेंव्हा टांगला जरासा, इंद्रधनुला हिंदोळा...
सूर्य अस्ताला कलला, धनुष्य मोडून गेला.

जेंव्हा माळले जरासे, शुभ्र गारांचे मोती...
आले ऊन कवडसे, माळ चोरून ते नेती.

जेंव्हा गुंफल्या जराश्या, चंचलश्या जलधारा...
गेला उनाड भरारा, गोफ उसवून वारा.

जेंव्हा झंकारली जरा, मनी मृदगंधाची धून...
कोसळत्या निनादात, गेली विरून.. वाहून...

पण, जेंव्हा खोचला जरासा, भाळी मोराचा पिसारा...
लाजली सृष्टी सारी, रंग उरला निळा... गहिरा...

___ जुई

सण ... 'आज कल'





           नेहेमी प्रमाणे ऑफिस मध्ये लॅपटॉपसमोर बसून काम करत होते... दसऱ्याचा दिवस... सुट्टी नाही.... कामात लक्ष लागेना. झेंडूची फुलं, आपट्याची पानं, श्रीखंडाचा घमघमाट आठवला... काय करावं सुचेना.... सरळ हाफ डे टाकून घरी जावं का ? पुष्कर ला सांगते.. आज लवकर ये घरी.. दसरा आहे. पण घरी जाऊन तरी काय करणार?  इथे झेंडूची फुलं कुठे मिळतील काय माहित ? आणि पानं वाटायला कोणाकडे जाणार ? आपण आपल्या सगळ्या शेजाऱ्यांना ही नीट ओळखत नाही... इथे आहोत तो पर्यंत हे असंच होणार का नेहेमी ?

२ महिन्यापूर्वीची गोष्ट...सकाळी ब्रेकफास्टची तयारी करत होते. ब्रेड स्लाईसेस टोस्टर मध्ये सरकवल्या आणि आज अंडं उकडावं की ऑम्लेट करावं या विचारात फ्रीज च्या दारापाशी उभी होते तेवढ्यात फोन वाजला... एवढ्या सकाळी फोन म्हणजे आईचाच असणार...
मी:  बोल ग आई   
आई: अगं लक्षात आहे ना...आज नागपंचमी आहे. तुला कदाचित लक्षात आलं नसेल म्हणून  मुद्दाम लवकर फोन केला. आज काही भाजायचं-चिरायचं नसतं बरंका...आणि हां..आता तुला तिथे  नाग कुठून दर्शन देणार म्हणा...पण नागाची रांगोळी किंवा चित्र काढ आणि त्याला नैवेद्य दाखव आठवणीनी...
मी: चित्रासमोर नैवेद्य वगैरे ठीक आहे..पण न भाजण्याचं आणि चिरण्याचं कसं जमेल ? ऑफिस ला जायच्या आत स्वयंपाक करून जायचंय ... आणि एक मिनिट.. टोस्टर मध्ये ब्रेड टाकलाय आत्ताच.. तो भाजण्याच्या कॅटेगरीमध्ये येतो का ग ? 
आई: अगं बाई.. ते नाही माहित. बर मग ते राहू देत... आज निदान फक्त काही मांसाहाराचं खाऊ नका...

नागपंचमीचा विचार करता करताच ऑफिस ला पोचले.. अर्रेच्चा .. म्हणजे श्रावण सुरु होऊन ५ दिवस झाले सुद्धा.. कळलंच नाही.... घरी असतो तर...? भरून आलेलं आभाळ, मातीचा सुंदर वास, कोवळ्या अंकुरांचा ताजा-तवाना पोपटी रंग.. हे सगळे ""श्रावण येणार असा निरोपच घेऊन येतात ! लहानपणीची नागपंचमी आठवली... हातावर मेंदी काढलेली असायची... घरात पुरण शिजवलेलं असायचं... एका वर्षी बाबांनी खास सर्पोद्यानात नेलं होतं...साप-नागांची खरी माहिती व्हावी म्हणून. 'गेले ते दिन गेले' म्हणत कामाला लागले...अनिता दिसली ऑन-लाइन ... माझी इथली एकुलती एक जवळची मराठी मैत्रीण. तिचा स्टेटस मेसेज होता: स्नेक-माराथोन --ऑसम फन. मला तिचे असे विचित्र स्टेटस मेसेजेस कधीच कळत नाहीत. असो...लगेच चॅट-विंडो उघडली. 
मी: हाय ! ऑफिस मध्ये आहेस का ? अगं ऐक ना.. आज नागपंचमी आहे...
अनिता: हो, माहितीये. म्हणून तर हा स्टेटस :)
मी: म्हणजे ?
अनिता: अगं.... सहज सर्च करत होते नागपंचमी विषयी.. तर या गेम ची लिंक  सापडली. स्नेक मॅरॅथॉन.खूप धमाल आहे.
मी: गेम खेळतीयेस ? काम नाही वाटत आज काही ? ;)
अनिता: आहे थोडसं... पण अगं हा टीम नि खेळायचा गेम आहे... तर आत्ता ब्रेक मध्ये माझ्या कलीग्स ना शिकवत होते... :) आपल्या टीम च्या सापाला शेवटपर्यंत लवकर पोचवायचं असतं... वाटेतल्या बीळांवर आणि फूड वर जो फास्ट क्लिक करू शकतो तो जिंकतो :)

नागपंचमी च्या दिवशी सापांना जिंकवण्याच्या नादात अचानक 'माऊस' ला प्राप्त झालेलं महत्त्वं बघून गम्मत वाटली! 

असा आयत्या वेळी एखादा सण आहे हे लक्षात येणं काही खरं नाही. पुढच्या वेळी पुण्याहून येताना नक्की कालनिर्णय घेऊन यायचं असा निश्चय केला. नाही तर खूप धावपळ उडते. गुढीपाडव्याला असंच झालं...सकाळी सकाळी 'अहो आईंचा' फोन. "" गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हा दोघानाही ! पहिलाच पाडवा तुमचा. मग, उभारली का नाही गुढी ? झाली पळापळ सुरु... कपडे वाळत घालायची काठी सापडली. त्यावर घालायला सिल्क चा रुमाल ही सापडला.. पण आता त्यावर उपडा घालायला चांदीचा कलश कुठून आणायचा ? काचेचा ग्लास चालतो का ? आंब्याची पानं नाहीत आणि कडू-निंबाची ही नाहीत... साखरेच्या गाठी नाहीत. आता काय करायचं ? नंतर शेवटी आम्ही आपापल्या 'फेसबुक' च्या भिंतीवर गुढीचं चित्र उभारून आमचा पहिला पाडवा साजरा केला ! 

तसा पहिला सण होळी म्हटला पाहिजे. नवीनच लग्न होऊन आलो होतो इथे. खूप उत्साहात होळी साजरी करू असं ठरवलं. त्या निमित्तानी एक गेट-टुगेदर होईल. इथल्या काही मित्र-मैत्रीणीना बोलावलं. शेकोटी असेल असं सांगितल्यावर पहिलीच प्रतिक्रिया अशी आली होती की "" अच्छा, म्हणजे बारबीक्यू का? आम्ही कपाळाला हात लावला. 

लग्नाचं पाहिलं वर्ष म्हणून श्रावणातल्या मंगळागौरी चं महत्वही खूप होतं ! नेहेमीप्रमाणे
आई : ""तुझी पहिलीच ग मंगळागौर. इथे असतीस तर किती कौतुकानी साजरी  केली असती. पण तुम्ही आता बिझी मुली. थोड्या थोडक्या गोष्टींसाठी सुट्टी घेऊन येणही परवडण्या सारखं नाही. बर... ऐक, निदान या मंगळवारी पाच सवाष्ण बायकांना जेवायला घाल.  
मी सवाष्ण बायकांच्या शोधाला लागले. भारतीय नसल्या तरी लग्न झालेल्या म्हणजे सवाष्णच की असा विचार करून ऑफिस मधल्या पाच जणींबरोबर लंच चा प्लान केला. मॅनेजर असलेल्या मेरी चा निरोप आला की मंगळवारी मीटिंग आली आहे एक... बुधवारी जाऊ या लंच ला.आता हिला मंगळवार चं महत्व कसं समजावून सांगू ? शेवटी पुढच्या आठवड्यातल्या मंगळवारी प्लान ढकलून टाकला.तरी नंतर  हळदी-कुंकू न देताच कसं ग जेवायला घातलस? या प्रश्नाला मात्र मी उत्तर नाही देऊ शकले.

आई ला एक दिवस विचारलं होतं की एखादा सण वीकेंड ला नाही आलाय का ग? म्हणजे छान, निवांत करता येईल सगळं. थांब हां... बघते.... अगं, या वेळी राखी पौर्णिमा आलीये रविवारी  छान.... मी इथे. माझे सगळे भाऊ तिथे. रविवार असून काय उपयोग ?  यावर आई म्हणाली होती  बरं झालं बाई तुम्ही दिवाळी ला इथे येताय .. म्हणजे निदान एक तरी सण रीतसर होईल तुमचा !  

हे वाक्य मात्र विचार करायला लावणार होतं. म्हणजे मी इथे कितीही प्रयत्न केला, आमची कितीही त्रेधा उडली, आणि आमच्या परीने आम्ही कितीही सण साजरे केले तरी घरच्यांच्या लेखी 'धड एकही सण रीतसर नाही केला' असंच होईल का ? आपण तरी हे सगळं नक्की कशासाठी करतोय ? आई-बाबा आणि 'अहो-आई-बाबांसाठी ?  का आपल्या आनंदासाठी? प्रत्येक सणामागची भावना महत्वाची का तो साजरा करण्याची रीत? सगळेच करतात म्हणून आणि इतकी वर्षे आपणही करत आलो म्हणून एखादा सण त्याच ठराविक पद्धतीने साजरा करायचा.... मग त्यात खूप अडचणी आल्या आणि ते एक जिकिरीचं काम वाटायला लागलं तरी ? त्यातला आनंदच विरून गेला तरी ?
काही सण हे एखाद्या प्रदेशावर, तिथल्या हवामानावर आणि तिथल्या रूढी-परंपरांवर आधारलेले असतात. परदेशात किंवा नवीन जीवन-पद्धती मध्ये त्या सणाविषयीच्या काही गोष्टी विसंगत वाटू लागल्या तर त्या थोड्या बदलायला काय हरकत आहे ? आपली संस्कृती जपण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण आपले सण साजरे केले तरी ते जसेच्या तसे पूर्वीसारखेच  वाटतील असा हट्ट कसा ठेवता येईल ? थंडीचे दिवस असतात म्हणून आपण उष्ण प्रवृत्तीचा तीळ-गूळ संक्रांति ला वाटतो. पण कायमच उष्ण-दमट हवा असलेल्या सिंगापुरात चॉकलेट्स वाटून शेजाऱ्यांशी ओळखी वाढवल्या तर काय हरकत आहे ? वटपौर्णिमेला वडाचं झाड शोधून त्याला फेऱ्या मारण्यापेक्षा ४-५ नवीन झाडं लावली तर काय हरकत आहे ? (हवं तर जोडीने झाडं लावावीत म्हणजे त्या दिवशीचं नवऱ्याचं + झाडाचं महत्व साधलं जाईल ! ) रोजचीच झोपायची वेळ ११-१२ झाली असेल तर कोजागिरीच्या जागरणाचं वेगळेपण काय राहणार ? मग आपण जिथे राहतो तिथला मून फेस्टिवल हा आपल्या कोजागिरी साठीच आहे असं म्हणून हातात कंदील घेऊन, मून केकचा आस्वाद घेता घेता चंद्राच्या सौंदर्याच कौतुक केल तर काय हरकत आहे ?  पोष्टापेक्षा किती तरी पटींनी फास्ट असणाऱ्या इ-मेल द्वारा राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा आपल्या भावाला दिल्या किंवा त्याहीपेक्षा नवीन मध्यम वापरून त्या दिवशी व्हिडिओ-चॅट करून व्हर्च्युअल राखी बांधली तर काय हरकत आहे ? सगळे सण आपल्याला निसर्गाचं महत्व शिकवतात, मानवी नाती-गोती कशी जपावी हे शिकवतात, रोजच्या नियमित कामाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येतात, आप्तेष्टांच्या भेटी घडवतात. हे सगळं महत्वाचं असताना बरोबर पद्धत कोणती आणि चुकीची कोणती या वादात कशाला पडायचं ? 

तेवढ्यात फेसबुक च्या विंडो मध्ये नवीन मेसेज आला. ' Priya has shared Golden leaves with you, wishing you happiness and prosperity in your life! '  मी मनातल्या मनात हसले, तिलाही एक सुंदरसं इ-ग्रीटिंग पाठवून दिलं आणि आजच्या दिवस प्रोफाईल वर लावायला माझा एखादा साडीतला फोटो आहे का 
शोधायला लागले. :)

-जुई
(ऋतुगंध - शरद  (सिंगापूर) मध्ये पूर्व-प्रकाशित )