Monday, January 30, 2012

एकेका लग्नाची गोष्ट !


लग्न मंडप सजला आहे. फुलांच्या माळा सगळीकडे सोडलेल्या आहेत. मुहूर्ताची वेळ यायला अजून थोडा अवकाश आहे. जवळ जवळ ४००-४५० आप्त-स्वकीय-मित्र मंडळींनी सभागृह फुलले आहे... भरजरी, सोनसळी भपक्याने नटले आहे. एकीकडे जेवणाच्या हॉलमध्ये नंतरच्या भोजनाची तयारी जोरात चालू आहे. बाहेर वधु-वरांना घेऊन जाण्यासाठीची गाडीही दिमाखाने सजली आहे. रुखवतावर उंची वस्तू, कलाकृती वगैरे कलात्मक रित्या मांडून ठेवल्या आहेत. वधूपिता सगळी व्यवस्था चोख होते आहे ना हे बघण्यात मग्न आहेत. नवरा मुलगा - परदेशस्थ, हुशार, देखणा.. मित्र मंडळींच्या गरड्यामध्ये वेढलेला आहे. इकडे करवल्या विचार विनिमय करताहेत ... नवऱ्या-मुलाचे बूट कसे पळवता येतील या विषयी. वरमाई कौतुकाने सगळीकडे मिरवते आहे आणि वधूची आई हलल्या काळजानी पुढच्या विधीच्या तयारीला लागली आहे. 

या सगळ्या धामधुमीत, सभागृहात मांडलेल्या खुर्च्यांच्या दुसऱ्या रांगेत वधूचे आज्जी-आजोबा बसले आहेत. खरं म्हणजे इतर सगळ्या गोंधळामध्ये त्यांची उठ-बस नको म्हणून त्यांना तिथे बसवले गेले आहे. आज्जींच्या मनात चाळवा -चाळव चालू झाली आहे. 'एकदा अक्षत पडली की पोरीला दोन क्षण सुद्धा मोकळे मिळणार नाहीत. आणि मग सासरी जाईल, भुर्रकन परदेशातही निघून जाईल नवऱ्याबरोबर .. मग कशी आपल्याला भेटणार? ' नातीशी चार शब्द बोलायची, तिला प्रेमानी जवळ घेऊन तोंडभर आशीर्वाद द्यायची आज्जींना तीव्र इच्छा होते. त्या खुर्च्यान्मधून वाट काढत काढत हॉल मधल्या वधु-पक्षाच्या खोली कडे निघतात. ' नातीची तयारी चालू असेल आत. साडी नेसायची सवय नाही.. आज दिवसभर तो जड शालू कसा सांभाळणार ? ' असा विचार करत त्या आत जाणार तेवढ्यात एक बाई खोलीचं दार बंद करत म्हणते, ' नवरीचा मेक-अप चालू आहे ... आता प्लीज तिला कोणी डिस्टर्ब करू नका." दार धाडकन बंद होतं आणि आज्जींच्या मनात एक आठवणीची खिडकी उघडते ... त्यांच्या स्वतःच्या लग्नाची आठवण!

साल: १९४८
वेळ: साधारण हीच
स्थळ: खुन्या मुरलीधर मंदिर, पुणे 

मंदिराच्या प्रशस्त आवारात लग्नाची तयारी चालू आहे. मोजक्याच आप्त आणि मित्र मंडळीनी आवर फुलले आहे. लग्नाचे जेवण म्हणून अवघ्या २५ पानांचा स्वयंपाक पाठीमागे चालू आहे. २१ वर्षांचा नवरा-मुलगा. खादीचा शुभ्र पायजमा आणि खादी सिल्कचा शर्ट अंगात. मुलाच्या घराची अशी ५-६ च माणसे. १७ वर्षांची नवरी मुलगी. पुण्यात नातेवाईकांकडे राहणारी. वडील नाहीत आणि आई, भावंडे लांब नागपूरला. 'मुद्दाम कर्ज काढून लग्नाला येऊ नकोस. नंतर पाया पडायला आम्हीच येऊ' असे मुलीने आईला कळविले असल्यामुळे मुलीकडचे पुण्यातले नातेवाईक तेवढे लग्नाला हजर. अशी परिस्थिती  असताना जमेल तेवढाच माफक शृंगार मुलीनी केला आहे... नवी साडी, गजरे, हातात हिरव्या बांगड्या आणि मुंडावळ्या. पण या तरुण वयातही असलेला समजुतदारपणा, विचारी स्वभाव, आत्मविश्वास आणि पुढच्या आयुष्याविषयीची स्वाभाविक उत्सुकता या सगळ्याच्या मिश्रणातून एक वेगळेच तेज चेहऱ्यावर झळकते आहे. 
मागच्या वर्षीच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मुलाच्या व त्याच्या घरच्यांच्या स्वातंत्र्य-चळवळीतील सहभागाचा आणि सुधारक, पुरोगामी विचारांचा प्रभाव समारंभावर पडलेला जाणवतो आहे. मानापानाची, देवाण-घेवाणीची प्रथाही इथे न पाळल्यामुळे समारंभाला वाद-विवादाची झालरही नाही. अगदी जवळच्या लोकांसमवेत दोघांनी एकत्र जीवन फुलविण्याची सुरुवात करण्याचा साधा-सोपा सोहळा. कुठलाही आवेश, दिखावा नाही. तशी मानसिकताही नाही.
मंदिराचे भटजी आता पुकारा करीत आहेत... सांगत आहेत की 'सगळी तयारी झाली, मुहूर्त घटिका आली. अंतरपाट कोण धरेल?' त्याच बरोबर बाहेर श्रावण सरींनीही हजेरी लावली आहे. मोजके ५ विधी, हारांची देवाण-घेवाण आणि नवऱ्या-मुलाने वधूच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत घालताच सुमंगल लग्न - सोहळा पार पडलेला आहे. येणाऱ्या सुख, दुःख, कष्ट, आनंद सगळ्यासामावेत पुढच्या आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ लाभल्याचा अपार, निर्भेळ आनंद दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडतो आहे. 

"आज्जी.. आज्जी अगं आत ये ना... " हाक ऐकून आज्जी भानावर येतात. नात दार उघडून बाहेर येते आणि आज्जींना हाताला धरून आत घेऊन जाते. 'अगं तयारी एकीकडे होत राहील. अजून थोडा वेळ आहे. मला तुझ्याशी पुन्हा इतक्यात असं बोलायला कधी मिळणार? मला माहितीये तू माझी काळजी करत असणार... पण नको करूस. परदेशात गेल्यावरही मला माझं काम, घर सगळं येईल सांभाळता आणि आम्ही दोघं मिळून करू गं व्यवस्थित मॅनेज. शेवटी मी तुझीच नात आहे :) आता तू आणि आजोबा मात्र तब्येतीची काळजी घ्या. माझं तिकडे सगळं सेट झालं की मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे काही दिवस. माझा संसार बघायला येशील ना? " नातीचे डोळे उत्साहानी चमकतात. चेहेऱ्यावर मेक-अप चा लेप असला तरी डोळ्यातले भाव तसेच असतात. समजुतदारपणा, आत्म-विश्वास, आनंद, उत्साह तोच. आज्जींच्या मनात येते की तीन पिढ्यांच्या काळात परिस्थिती किती बदलली.. सुबत्ता आली. सगळ्या हौसा-मौज पुरवता येण्या इतकी संपन्नता आली. भपका आला... दिखावा आला... पण जेंव्हा नवरा-नवरीच्या चेहऱ्यावर असाच निर्भेळ, अपार आनंद झळकतो... त्यांनी एकमेकांना प्रेमानी, विश्वासानी स्वीकारल्याचं जाणवतं तेंव्हाच खरं सगळं सुमंगल होतं. बाकी इतर कशाला काही महत्त्वं नाही. 
नातीच्या डोक्यावर त्या हात फिरवून 'सुखी रहा' म्हणतात आणि सोहळा जणू आत्ताच पार पडल्याच्या आनंदात बाहेर येऊन आजोबांच्या शेजारी बसतात.

- जुई