Sunday, August 4, 2013

आनंदाचं बीज

इमारतीत नवीन बिऱ्हाड नुकतंच आलं होतं... सगळ्यात वरच्या मजल्यावर. तसे चारच मजले होते पण लिफ्ट नसल्यामुळे चार मजले चढून जाण सगळ्यांच्याच जीवावर यायचं. नवीन येणाऱ्या बिऱ्हाडात मध्यम वयीन नवरा-बायको, त्यांचा तरुण कमावता मुलगा आणि कॉलेजमध्ये शिकत असलेली मुलगी होती. सामानाचा टेम्पो खाली उभा होता. पलंग, कपाट वगैरे वस्तू जिन्याचे कोन-कोपरे सांभाळून वर चढवणं चालू होतं. मुलगी या सामानाच्या स्थलांतराकडे लक्ष देत होती. आम्ही तळ-मजल्यावर राहत असल्यामुळे आमच्या दारावरूनच सगळी ये-जा चाललेली... मी त्या वेळी ७-८ वर्षांची असेन. मी शाळेचा गृहपाठ करत बसले होते आणि आई वर-वरची कामं करत होती. काही वेळानी दार वाजवून ती आत आली. "काकू थोडं पाणी देता का? फारच धाव-पळ चाललीये ना...   काही कागद-पत्रांच्या कामासाठी दादा आणि बाबा बाहेर गेलेत, आई वरती घरात आणि मी पण वर गेले तर सामानाकडे कोण बघणार? पण आता उन्हात थांबून फारच तहान-तहान होतंय म्हणून म्हटलं तुम्हालाच पाणी मागावं.  आणि मी अजून ओळख नाही ना करून दिली? मी शर्मिला. शर्मिला पाटील. आम्ही इथे वर राहायला आलोय. आमचं आधीच घर फारच लांब होतं. मला कॉलेजला आणि शशांक दादाला त्याच्या ऑफिसला जायला खूपच गैरसोयीचं होतं. इथे एकदम मोक्याच्या जागी आता आलोय तर खूप छान वाटतंय. काकू पाणी मस्त गार आहे ... माठातलं आहे का? वाळ्याचा वास येतोय छान. एका जग मध्ये अजून देता का? सामान चढवून हे लोक पण दमले असतील.. त्यांना देऊन येते." आईला काही बोलायची संधीही न देता धांदलीत बाहेर गेली. ती आमची शम्मी-ताईशी झालेली पाहिली भेट. दिसायला चार-चौघींसारखी, उंचीला बेताची, रंग सावळा पण एकदम लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे मोत्यासारखे दात आणि निखळ हास्य... जे बघून आपल्याही चेहऱ्यावर अनाहूतपणे स्मित तरळून जावं.

नंतर पाण्याचा जग परत द्यायला आली आणि तासभर गप्पा मारत बसली. माझ्याशी पण शाळेतल्या गमती सांग, एखादा बैठा खेळ शिकव किंवा मैत्रिणींची नावं विचार... वगैरे बोलत होती. माझा छोटा भाऊ २ वर्षाचा होता. तो दुपारची झोप संपवून उठल्यावर तर त्याला सोडेच ना... " काकू, मला ना लहान मुलं फार आवडतात. जुन्या घराच्या जवळ पण एक छोटी मुलगी रहायची .. मी तिला रोज घरी खेळायला घेऊन यायचे. ह्याला पण अधून मधून खेळायला घेऊन गेले तर चालेल का? फारच गोड आहे हा. इथे याच इमारतीत आणखी लहान मुलं पण आहेत का? मगाशी खेळताना दिसली होती बाहेर. व्वा.... मजा येणार या घरात. अजून आम्ही सामान लावतोय पण मला आत्ताच आमचं हे नवीन घर फार आवडायला लागलंय. "

 
आणि मग बघता बघता शम्मी ताई अगदी घरचीच होऊन गेली... रोज १-२ वेळा तरी चक्कर असे. सकाळी लवकर कधी आली तर म्हणे " छोटूचा एक शिळा पापा घेऊन जाते... मग त्याची अंघोळ झाली कि ताजा पापा घ्यायला पुन्हा येईन." उत्साह मावळलेला कधी दिसायचाच नाही. दिवसभर कॉलेजमध्ये जाऊन आली तरी संध्याकाळी, रात्री अगदी तरतरीत... आमच्याशी दंगा करायला तयार. माझ्या भावाला काही तिचं शर्मिला हे नाव म्हणता यायचं नाही म्हणून तो तिला शम्मी ताई म्हणायचा आणि तेंव्हापासून ती सगळ्यांचीच शम्मी ताई झाली होती.  इमारतीतल्या सगळ्या लहान मुलांनाही चटकन तिचा लळा लागून गेला. सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळायचा बेत आखला कि शम्मी ताई त्यात आहेच... दिवाळीचा किल्ला करायला शम्मी ताईची धावपळ सुरु... रविवारी सगळ्यांना घेऊन टेकडी किंवा पर्वतीवर घेऊन जायला शम्मी ताई तयार... गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवणे, बाल-नाट्याला घेऊन जाणे या पण तिच्या आवडीच्या गोष्टी.

तिची आई कधी कधी माझ्या आईशी गप्पा मारताना कौतुक मिश्रित तक्रार करे ' बघा हो.. एवढी मोठी झाली तरी हूडपणा काही जात नाही अंगातून. आता लहान पोर का आहे? पण रमतेच फार लहान मुलांत. जीव लावून असतात लहानगेही ... म्हणून काही म्हणवत नाही. तसं काहीच वाईट करत नाही पण कधी तरी मोठं व्हावंच लागेल न.. किती दिवस खेळत बसता येणार आहे असं? " तिच्या आईचं बोलणं तेंव्हा कानावर पडलं तरी समजलं नव्हतं. पण जेंव्हा शम्मी ताईचं लग्न ठरलं तेंव्हा आता ती सोडून लांब जाणार याची जाणीव झाली. शम्मी ताई लग्न होऊन औरंगाबादला निघून गेल्यावर बरेच दिवस कोणालाच करमले नाही. सारखीच तिची आठवण येत होती. पण हळूहळू सगळे आपापल्या व्यापात गुंतले. अधून मधून विषय निघत राहिला पण सगळ्यांनी तिचं नसणं स्वीकारलं होतं. लहानग्यांना जास्त दिवस तिची कमी जाणवत राहिली एवढंच. एखाद्या वर्षात तिच्या घरचेही दुसरीकडे राहायला गेले आणि शम्मी ताई कधी माहेरी आली कि भेटेल याही शक्यतेला पूर्णविराम मिळाला. 

त्या नंतर खूपच म्हणजे ९-१० वर्षांनी एका दुपारी दारात शम्मी ताई हजर !! केसांत १-२ रुपेरी तारा, सराईतपणे चापून नेसलेली साडी आणि चष्मा सोडल्यास बाकी काहीही फरक नाही. तेच निखळ हसू चेहऱ्यावर आणि आनंदाचा झरा डोळ्यात. सगळ्यांना अगदी घट्ट भेटली आणि नेहेमीसारखी तिने बोलायला सुरुवात केल्यावर आम्हाला काही म्हणायची संधीही दिली नाही. आई बाबांची चौकशी केली, मी किती मोठी झालीये यावर आश्चर्य दाखवलं शेजारच्या काकुंविषयी विचारलं. आता ती रहायची त्या घरात कोण राहतंय विचारलं...आणि माझ्या छोट्या भावाला भेटायला आतूर झाली. पण आईनी तिला जरा शांत केलं .. म्हणाली 'अगं, तू जराही बदलली नाहीस. जरा दम धरशील कि नाही? तो येईल क्लासहून एवढ्यात पण अगं तू इथे राहायचीस तेंव्हा तो फारच लहान होता... २-३ वर्षांचा. एवढ्या लहान वयातलं नाही आठवत कधी कधी ... तर तू काही मनाला लावून घेऊ नकोस जर त्याने पटकन ओळखलं नाही तर. तसं होणं साहजिक आहे म्हणून सांगितलं ... तू आता बस जरा आणि तुझ्याविषयी तर सांग. कशी आहेस? कुठे.. औरंगाबादलाच असतेस का? घरचे कसे आहेत? " आईचं बोलणं ऐकून शम्मी ताईच्या चेहऱ्यावर एक अनामिक भाव तरळून गेला जो बघून तेवढ्या क्षणापुरती हि आपली शम्मी ताई नाहीच. कोणी वेगळीच शहाणी, विवेकी, मोठी बाई आहे असं वाटून गेलं. जोराची सर येऊन गेल्यावर जसा नंतरचा पाऊस समाधानी बरसत राहतो तशी ती आता वाटायला लागली. आम्हाला एवढ्या वर्षांनी भेटून झालेला आनंदाचा पहिला जोर कमी झाला आणि आरामशीर बसून ती बोलायला लागली.
" काकू, किती वर्ष झाली न आपल्याला भेटून. लग्नाआधीचं जग एकदम वेगळंच असतं ना? फार जुन्या, स्वप्नासारख्या वाटतात मला त्या गोष्टी. मी लग्न होऊन गेले न सासरी तेंव्हा एवढी भीती वाटत होती कि कसे असतील लोक, नवरा समजून घेईल कि नाही? नवीन घर, नवीन शहर... डोळ्यासमोर एकही ओळखीचं माणूस नाही. पण खरं सांगू.. हि सगळी भीती अनाठाई होती. खूपच प्रेमळ लोक आहेत हो सगळे. आणि मोठ्या दिरांची एक छोटुकली पण होती ना घरी. मग तर काय आमची गट्टीच जमली होती. काही महिन्यात दीर पुण्याला आले नोकरी-निमित्त आणि मग घरी मला करमेना. आम्ही तेंव्हा मग घरात आपलं छोटं कुणी आणावं असं ठरवलं पण कसं असतं बघा. मला मुलांची एवढी हौस पण एका तपासणीतून कळलं कि मला कधी मूल नाही होऊ शकणार. मी अगदी तुटून गेले हे ऐकल्यावर. दुसऱ्या घरच्या कुणी मलाच बोल लावले असते पण घरच्यांनी समजून घेतलं. अडचण हीच होती कि मीच ही गोष्ट पचवू शकत नव्हते. आधी स्वतःला, नवऱ्याला... मग नशिबाला, देवाला.. सगळ्यांना दोष देऊन झाला... मनाची खिन्नता कित्येक दिवस गेली नाही. उदासपणे घरात या खोलीतून त्या  खोलीत हिंडत राहायचे. काहीच करायला उत्साह वाटायचा नाही. सगळ्या गोष्टी निरर्थक वाटू लागल्या. पण माझ्या नवऱ्याने खूप साथ दिली. मला हि गोष्ट किती लागलीये हे तो समजून होता. त्यानेच मग मला दत्तक मूल घेण्याविषयी सुचवलं. आम्ही एका अनाथाश्रमाला भेट दिली आणि तिथे गेल्यावर मला एकदम जाणवलं कि माझी आणि या किंवा अश्या मुलांची जोडी खरं तर उत्तम आहे. त्यांना प्रेम करणारं, जपणारं कोणी हवं आहे आणि मला माझ्या प्रेमाचा घडा कोणावर तरी रिता करायची इच्छा आहे. आणि मग एकानंतर एक गोष्टी घडत गेल्या आणि एखादं मूल दत्तक घेण्याऐवजी आम्ही एक अनाथाश्रमच दत्तक घेतलं असं म्हणूया. सुदैवाने सुरुवातीला पदरचे घालून आणि नंतर मिळालेल्या देणग्यांच्या, ट्रस्टच्या मदतीनी उत्तम चालू आहे. मला कोणी विचारलं कि तुम्हाला किती मुलं -बाळ ? तर मी म्हणते सध्या ३५ आहेत पण कदाचित पुढच्या महिन्यात २-३ अजून होतील! आम्ही अनाथाश्रम असं नाही म्हणत तर प्रेमालय असं नाव दिलंय संस्थेला. त्याच संदर्भात एका कामासाठी इथे जवळ आले होते म्हणून म्हटलं भेटून जावं "
आम्ही सगळे हे ऐकून स्तब्ध झालो होतो. आईला तिचा खूप अभिमान वाटला, कौतुक वाटलं. काय बोलू आणि काय नाही असं तिला झालं होतं तेवढ्यात माझा भाऊ क्लासहून आला आणि त्यानी शम्मी ताईला ओळखलंही... तेंव्हा असं वाटून गेलंच कि कुणी ओळखलं नाही हे मनाला लावून घेण्याच्या पार गेली आहे ही. एखाद्या दुःखाचा डाग जपून ठेवण्याऐवजी त्याच्या कोंदणात नवीन आनंदाचं बीज कसं फुलवावं हे हिच्याकडून शिकलं पाहिजे. मी तिच्याकडे वेगळ्याच भारलेल्या नजरेनी बघत होते आणि ती आपली हे सांगण्यात गुंतली होती कि तिच्या मुलांपैकी एक अगदी माझ्या भावासारखा दिसतो आणि फक्त तो तिला कसं शम्मी-आई म्हणतो!