Tuesday, September 18, 2012

आहेस...



वाटलं होतं 
सोडून जाशील तेंव्हा 
केवढा हलकल्लोळ माजेल 
माझ्या चिमुकल्या आभाळात

वाटलं होतं 
मी त्या प्रसंगाला तोंडच नाही देऊ शकणार

वाटलं होतं 
हे होणार माहित असूनही 
बसलेल्या त्या धक्क्यातून 
मी नाही स्वतःला सावरू शकणार 

पण तसं झालं नाही ...


लहानपणी तू सांगायचीस 
त्या गोष्टींमधले अर्थ उमगले मला अचानक 

जसा चेटकिणीचा जीव पोपटाच्या डोळ्यात असायचा
तसा .. खरं तर तुझा जीव माझ्या आठवणीत आहे
मी आहे .. तोपर्यंत तू आहेसच 

मागच्या श्रावणात तू मला दिलेलं अत्तर 
सगळ्यांना गंधवेडं करून आज संपलं
पण माहित आहे? 
अत्तराचा जीव सुद्धा त्याच्या कुपीत असतो

ती कुपी आता जपून ठेवीन 
ती आहे... तोपर्यंत तो गंध आहे ... आठवणी आहेत... तू ही आहेस...

__________ जुई 

Monday, March 12, 2012

पोरकेपण



पायातलाच चिरा ढासळल्यावर 
आधाराच्या भिंतीही पोरक्या झाल्या
आधी छत चंद्रमौळी होते
आता तारकाच कौलारू झाल्या 

बंधाराच फुटून गेला तर 
वाहणाऱ्याला काय त्याचे?
इकडे उरली व्याकूळ तहान 
तिकडे कल्लोळत पूर नाचे 

थेंबभर मनात झालीये अगदी  
आभाळभर प्रश्नांची दाटी
आता फिरतेय शोधत उत्तरं
शिदोरीत बांधून मुळातली माती 
________ जुई 

गाठी

(गुलझार यांच्या 'जुलाय्हा' या कवितेवरून प्रभावित )

हाताशी मोकळा वेळ असला की मी आठवणींचा गुंता समोर घेउन बसते 
एक एक गाठ सोडवताना 
कित्येक धरून ठेवलेली, निसटून गेलेली माणसे भेटतात 
काही लक्ख, काही धूसर प्रसंग आठवतात  
तोपर्यंत दुसरीकडे पुन्हा गुंता झालेला असतो.
एकदा मात्र एक सुट्टे टोकच लागले हाताला 
त्याला धरून मागे जाता जाता त्याच्या दुसऱ्या टोकाशी तू भेटलास
मागे एकदा असंच एक टोक स्वतःकडे ठेवून, 
मध्ये घट्ट गाठ बांधून, दुसरं टोक माझ्याकडे दिलं होतंस.
म्हणाला होतास "गाठी या वरतीच बांधलेल्या असतात!
असेल आपली पक्की तर टिकेल"
नंतर आपापल्या मार्गांनी जाताना ...
दोन्हीकडून ओढ बसायला लागली.
पण त्यामुळे मधली गाठ अजूनच घट्ट झाली का?
कदाचित हो.... कदाचित नाही...
आपापल्या टोकाशी झालेला गुंता सोडवताना 
दोघांनाही बहुदा ,
मागे वळून पुन्हा त्या गाठीकडे बघण्याचं धैर्य झालं नाही 
आता फक्त सुतासारख्या सरळ तुझ्या आठवणीच तेवढ्या उरल्या 
_________ जुई 

Monday, January 30, 2012

एकेका लग्नाची गोष्ट !


लग्न मंडप सजला आहे. फुलांच्या माळा सगळीकडे सोडलेल्या आहेत. मुहूर्ताची वेळ यायला अजून थोडा अवकाश आहे. जवळ जवळ ४००-४५० आप्त-स्वकीय-मित्र मंडळींनी सभागृह फुलले आहे... भरजरी, सोनसळी भपक्याने नटले आहे. एकीकडे जेवणाच्या हॉलमध्ये नंतरच्या भोजनाची तयारी जोरात चालू आहे. बाहेर वधु-वरांना घेऊन जाण्यासाठीची गाडीही दिमाखाने सजली आहे. रुखवतावर उंची वस्तू, कलाकृती वगैरे कलात्मक रित्या मांडून ठेवल्या आहेत. वधूपिता सगळी व्यवस्था चोख होते आहे ना हे बघण्यात मग्न आहेत. नवरा मुलगा - परदेशस्थ, हुशार, देखणा.. मित्र मंडळींच्या गरड्यामध्ये वेढलेला आहे. इकडे करवल्या विचार विनिमय करताहेत ... नवऱ्या-मुलाचे बूट कसे पळवता येतील या विषयी. वरमाई कौतुकाने सगळीकडे मिरवते आहे आणि वधूची आई हलल्या काळजानी पुढच्या विधीच्या तयारीला लागली आहे. 

या सगळ्या धामधुमीत, सभागृहात मांडलेल्या खुर्च्यांच्या दुसऱ्या रांगेत वधूचे आज्जी-आजोबा बसले आहेत. खरं म्हणजे इतर सगळ्या गोंधळामध्ये त्यांची उठ-बस नको म्हणून त्यांना तिथे बसवले गेले आहे. आज्जींच्या मनात चाळवा -चाळव चालू झाली आहे. 'एकदा अक्षत पडली की पोरीला दोन क्षण सुद्धा मोकळे मिळणार नाहीत. आणि मग सासरी जाईल, भुर्रकन परदेशातही निघून जाईल नवऱ्याबरोबर .. मग कशी आपल्याला भेटणार? ' नातीशी चार शब्द बोलायची, तिला प्रेमानी जवळ घेऊन तोंडभर आशीर्वाद द्यायची आज्जींना तीव्र इच्छा होते. त्या खुर्च्यान्मधून वाट काढत काढत हॉल मधल्या वधु-पक्षाच्या खोली कडे निघतात. ' नातीची तयारी चालू असेल आत. साडी नेसायची सवय नाही.. आज दिवसभर तो जड शालू कसा सांभाळणार ? ' असा विचार करत त्या आत जाणार तेवढ्यात एक बाई खोलीचं दार बंद करत म्हणते, ' नवरीचा मेक-अप चालू आहे ... आता प्लीज तिला कोणी डिस्टर्ब करू नका." दार धाडकन बंद होतं आणि आज्जींच्या मनात एक आठवणीची खिडकी उघडते ... त्यांच्या स्वतःच्या लग्नाची आठवण!

साल: १९४८
वेळ: साधारण हीच
स्थळ: खुन्या मुरलीधर मंदिर, पुणे 

मंदिराच्या प्रशस्त आवारात लग्नाची तयारी चालू आहे. मोजक्याच आप्त आणि मित्र मंडळीनी आवर फुलले आहे. लग्नाचे जेवण म्हणून अवघ्या २५ पानांचा स्वयंपाक पाठीमागे चालू आहे. २१ वर्षांचा नवरा-मुलगा. खादीचा शुभ्र पायजमा आणि खादी सिल्कचा शर्ट अंगात. मुलाच्या घराची अशी ५-६ च माणसे. १७ वर्षांची नवरी मुलगी. पुण्यात नातेवाईकांकडे राहणारी. वडील नाहीत आणि आई, भावंडे लांब नागपूरला. 'मुद्दाम कर्ज काढून लग्नाला येऊ नकोस. नंतर पाया पडायला आम्हीच येऊ' असे मुलीने आईला कळविले असल्यामुळे मुलीकडचे पुण्यातले नातेवाईक तेवढे लग्नाला हजर. अशी परिस्थिती  असताना जमेल तेवढाच माफक शृंगार मुलीनी केला आहे... नवी साडी, गजरे, हातात हिरव्या बांगड्या आणि मुंडावळ्या. पण या तरुण वयातही असलेला समजुतदारपणा, विचारी स्वभाव, आत्मविश्वास आणि पुढच्या आयुष्याविषयीची स्वाभाविक उत्सुकता या सगळ्याच्या मिश्रणातून एक वेगळेच तेज चेहऱ्यावर झळकते आहे. 
मागच्या वर्षीच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मुलाच्या व त्याच्या घरच्यांच्या स्वातंत्र्य-चळवळीतील सहभागाचा आणि सुधारक, पुरोगामी विचारांचा प्रभाव समारंभावर पडलेला जाणवतो आहे. मानापानाची, देवाण-घेवाणीची प्रथाही इथे न पाळल्यामुळे समारंभाला वाद-विवादाची झालरही नाही. अगदी जवळच्या लोकांसमवेत दोघांनी एकत्र जीवन फुलविण्याची सुरुवात करण्याचा साधा-सोपा सोहळा. कुठलाही आवेश, दिखावा नाही. तशी मानसिकताही नाही.
मंदिराचे भटजी आता पुकारा करीत आहेत... सांगत आहेत की 'सगळी तयारी झाली, मुहूर्त घटिका आली. अंतरपाट कोण धरेल?' त्याच बरोबर बाहेर श्रावण सरींनीही हजेरी लावली आहे. मोजके ५ विधी, हारांची देवाण-घेवाण आणि नवऱ्या-मुलाने वधूच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत घालताच सुमंगल लग्न - सोहळा पार पडलेला आहे. येणाऱ्या सुख, दुःख, कष्ट, आनंद सगळ्यासामावेत पुढच्या आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ लाभल्याचा अपार, निर्भेळ आनंद दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडतो आहे. 

"आज्जी.. आज्जी अगं आत ये ना... " हाक ऐकून आज्जी भानावर येतात. नात दार उघडून बाहेर येते आणि आज्जींना हाताला धरून आत घेऊन जाते. 'अगं तयारी एकीकडे होत राहील. अजून थोडा वेळ आहे. मला तुझ्याशी पुन्हा इतक्यात असं बोलायला कधी मिळणार? मला माहितीये तू माझी काळजी करत असणार... पण नको करूस. परदेशात गेल्यावरही मला माझं काम, घर सगळं येईल सांभाळता आणि आम्ही दोघं मिळून करू गं व्यवस्थित मॅनेज. शेवटी मी तुझीच नात आहे :) आता तू आणि आजोबा मात्र तब्येतीची काळजी घ्या. माझं तिकडे सगळं सेट झालं की मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे काही दिवस. माझा संसार बघायला येशील ना? " नातीचे डोळे उत्साहानी चमकतात. चेहेऱ्यावर मेक-अप चा लेप असला तरी डोळ्यातले भाव तसेच असतात. समजुतदारपणा, आत्म-विश्वास, आनंद, उत्साह तोच. आज्जींच्या मनात येते की तीन पिढ्यांच्या काळात परिस्थिती किती बदलली.. सुबत्ता आली. सगळ्या हौसा-मौज पुरवता येण्या इतकी संपन्नता आली. भपका आला... दिखावा आला... पण जेंव्हा नवरा-नवरीच्या चेहऱ्यावर असाच निर्भेळ, अपार आनंद झळकतो... त्यांनी एकमेकांना प्रेमानी, विश्वासानी स्वीकारल्याचं जाणवतं तेंव्हाच खरं सगळं सुमंगल होतं. बाकी इतर कशाला काही महत्त्वं नाही. 
नातीच्या डोक्यावर त्या हात फिरवून 'सुखी रहा' म्हणतात आणि सोहळा जणू आत्ताच पार पडल्याच्या आनंदात बाहेर येऊन आजोबांच्या शेजारी बसतात.

- जुई  

Thursday, December 8, 2011

तो येतो आणि...

आधी कळवतो की 'येईन'
आपणही तयारी करतो त्याच्या स्वागताची
पण त्याच्या शब्दावर विश्वास कसा  ठेवावा?
वाट बघण्यातच आपले चार दिवस निघून जातात
रोजची कामं आपण सुरळीत चालू करतो
आणि मग अचानक, एखाद्या सकाळी सकाळी
दाणकन येतो सगळ्या लवाजम्या सकट
अंगणात, घरात, झोपेत, मनात, विचारात असा शिरतो...
आणि सगळीकडे पसारा करून ठेवतो.
आपली कमालीची धांदल उडते
पण तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

झाडांच्या डोक्यावर टपली मारून त्यांची पानं-फुलं खाली पाडतो
वाफे-आळी मोडून लहान लहान ओहोळांना पकडा - पकडी खेळायला सोडून देतो
पागोळ्यांची माळ तोडून ओसरीवर मोती पसरवून ठेवतो
मातीचा रंग अंगणभर सांडून ठेवतो
छपरावर नाचून नाचून अगदी गोंगाट माजवतो
तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

दाराला लावलेले उबेचे पडदे विस्कटून घरभर गारवा पसरून ठेवतो
आल्याचा चहा आणि कांदा भजीच पाहिजेत असा हट्ट करत,
स्वयंपाकघराच्या खिडकीत ठाण मांडून बसतो.
गौड मल्हार, मेघ, मिया मल्हार... सगळ्यांचे सूर एकच वेळी उधळायची घाई करतो
सगळ्या कामांना बुट्टी देऊन त्याच्याबरोबर भटकायला जायची गळ घालतो
तुषार, चैतन्य, प्रफुल्ल, हर्ष अश्या ढीगभर मित्रांना गोळा करून नुसता दंगा घालतो
तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

कपाटात कोंबलेल्या सगळ्या निळ्या- हिरव्या आठवणी खसकन बाहेर ओढून काढतो
लहानपणी दोघांनी मिळून सोडलेली होडी कुठपर्यंत पोचली विचारत राहतो
त्याच्या आणि माझ्या हातात हात गुंफून काही काळ नाचलेल्या त्या तिसऱ्याची चौकशी करतो
फक्त त्यालाच सांगितलेली गुपिते फोडायची धमकी देतो
दिवसभर भंडावून सोडल्यावर पुन्हा रात्री स्वप्नात येऊन चिडवत राहतो
तरीही त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...


माझ्या चिमुकल्या अंगणात उत्साह भरून जातो...
माझ्या एकट्या घराला जिवंत करून जातो...
माझ्या व्याकूळ मनाला सोबत करून जातो...
सांगून जातो की पुन्हा येईन,
पण त्याच्या शब्दावर विश्वास कसा ठेवावा?


_ जुई

Friday, May 13, 2011

उन्हाळ्याची सुट्टी !



शनिवारचा दिवस. सुट्टीचा. आदल्या दिवशी ऑनलाइन सिनेमा बघत झोपायला खूप उशीर झाल्यामुळे साहजिकच उशिरा उठले होते. डोकं जड झालं होत. जवळ जवळ जेवणाची वेळ होत आली असली तरी 'ब्रेकफास्ट सीरियल्स' आणि दुधाचा बाउल घेऊन स्वयंपाक घराच्या खिडकी पाशी उभी होते. खरं तर सकाळी तिथून छान कोवळं ऊन आत येतं... पण आता सूर्य चांगला डोक्यावर आलेला होता. हवेत थोडी धग जाणवत होती. सिंगापूर असून चक्क ३-४ दिवस पाऊस पडला नव्हता. आत जाऊन बेडरूम मध्ये AC च्या गारव्यातच बसावं असा विचार करत होते तेवढ्यात खालून खूप आरडा-ओरडा ऐकू आला. पाहिलं तर ७-८ लहान मुलांचा दंगा चालू होता. मग लक्षात आलं, की अरे एप्रिल महिना सुरू झालाय.... या मुलांच्या परीक्षा संपून मस्त सुट्टी चालू झाली असेल. एप्रिल-मे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचाच सीझन! उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी वगैरे कोणत्याही कारणानी घर, घरची माणसे, देश सोडून एवढ्या लांब आल्यावर हा काळ आपोआप सुट्टीचा न राहता फक्त उन्हाळ्याचा किंवा स्प्रिंग चा होऊन गेला होता आणि कामाच्या व्यापात, नव्या जीवन-पद्धतीशी जुळवून घेताना, रोजच नव्या परीक्षांना सामोरे जात काळाच्या बरोबर चालायच्या प्रयत्नात, मी 'आपण कधी तरी लहान होतो आणि आपल्याला दर वर्षी २ महिने पूर्ण-निव्वळ-बिना भेसळ सुट्टी असायची' हे विसरुनच गेले होते. घशातला खोलवरचा आवन्ढा गिळून आत जाऊन बसले पण उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण स्वस्थ बसू देई ना... एक एक गोष्ट डोळ्यासमोर यायला लागली.......उन्हाळ्याची सुट्टी... माझी लहानपणची, पुण्यातली उन्हाळ्याची सुट्टी कशी असायची?

वार्षिक परीक्षेच्या शेवटच्या पेपरची एवढी आश्चर्यकारक ओढ लागलेली असायची आणि कधी एकदा ती शेवटची उत्तर-पत्रिका देऊन टाकतोय असं झालेलं असायचं. कारण शेवटच्या पेपरचा दिवस हा परीक्षेत गणला जायचाच नाही. पुढच्या दोन महिन्याच्या पोटभर सुट्टीचा पहिला घास असायचा तो दिवस! अगदी लहानपणी जेंव्हा रिक्षावाले काका शाळेत सोडायचे-आणायचे तेंव्हा शेवटच्या दिवशी ते सरळ घरी आणून न सोडता आधी गुह्राळात घेऊन जायचे. उसाचा रस, त्यात हवा तेवढा बर्फ, (घे, घे.. मी नाही सांगणार तुझ्या आईला!),मग कधी कधी वडापाव आणि शेवटी पाण्याची रंगपंचमी(?) खेळून, चिकार दंगा करून आणि रिक्षात तश्याच ओल्या कपड्यांनी आणि चपला-बुटांनी भरपूर राडा करून मग आमचं ध्यान घरी पोचायचं आणि घरात पाउल टाकल्या टाकल्या आकाशवाणी च्या आविर्भावात एक घोषणा केली जायची "हुर्रे... माझी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे. आता मी खूप मज्जा करणार आहे आणि हवं तसं वागणार आहे...!" याला खर तर फार काही अर्थ नसायचा कारण हवं तसं वागता येणं म्हणजे काय हे तेंव्हा नाही कळायचं घरात राहून :)

परीक्षा चालू असतानाच सुट्टीच सगळं प्लानिंग झालेलं असायचं... त्यात दिवसाची सुरुवात कधीही झाली तरी त्यातला सकाळचा बराचसा वेळ हा कॅर्रोम, पत्ते वगेरे खेळण्यात घालवलाच पाहिजे असा एक नियम असायचा. अधून मधून कुतूहल आणि नाविन्य म्हणून सागरगोटे, सारीपाट असे आज्जीनी सुचवलेले खेळ व्हायचे पण त्यांचा जास्त टिकाव लागायचा नाही. लहान भावांना कटवून गुपचूप आम्ही 'मोठ्या' मुली एखादी च्या घरी 'घर-घर' सुद्धा खेळायचो. त्यात चुरमुऱ्याच्या पोळ्या आणि दाणे-गूळ यांचा लाडू करताना भारी वाटायचं.. पण त्यांनी पोट भरलं नाही की आपोआप घराकडे पाय वळायचे... दुपारच्या जेवणाची वेळ झालेलीच असायची तोपर्यंत. उन्हाळ्यातल्या जेवणाला मात्र काय साज असायचा! नेहेमीचीच भाजी-पोळी, पण त्या शेजारी आमरसाची वाटी आली की साध्या साडीचं जरतारी काठ-पदर लावल्यावर पैठणीत रुपांतर व्हावं तसं काहीसं व्हायचं. लहानपणी कधी हापूस साठीच असा हट्ट केल्याचा आठवत नाही. पायरी, केशर, गोटी ... कोणताही आंबा असला तरी त्याचा तोंडात मावणार नाही एवढा घास म्हणजे 'अहाहा' ! तूप किंवा दूध आणि मिरपूड वगैरे घालून साग्रसंगीत आमरस आताही कधी खाल्ला की त्याच्या चवीबरोबर उन्हाळ्याची सुट्टी जिभेवर रेंगाळायला लागते. 

दुपारच्या जेवणा नंतर 'खूप ऊन आहे, आत्ता अजिबात घरा बाहेर पडायचं नाही .. नाही तर ....' अश्या धमकीचा मान राखून घरातल्या घरात नवनवीन उद्योग सुरु व्हायचे. कुंडीतल बागकाम, वाचन, चित्रकला, सरबतानी भरलेला पेला फ्रिझमध्ये ठेवून त्याचं आईस-क्रीम होतं का याचे प्रात्यक्षिक प्रयोग, भरतकाम करून उशीचा अभ्रा विणता यावा या प्रयत्नात हातरुमालापर्यंतच टिकलेला उत्साह अश्या या ना त्या गोष्टींची दर वर्षी शिदोरीत भर पडायची. जर कुणी मावस-चुलत भावंड सुट्टीसाठी आली असतील तर या सगळ्याला अजूनच खुमार यायचा. अश्या भाऊ-बहिणींना दाखवायच्या निमित्तानी मग कोथरूडच्या बागेपासून संभाजी बाग, पेशवे पार्क, पर्वती, सर्पोद्यान, केळकर संग्रहालय या सगळ्यांना वार्षिक ठरलेली सहल घडायची. संध्याकाळी कुठे बाहेर जायचं नसलं तर मात्र कॉलोनी मधल्या ग्राउंड वर चिकार मित्र-मंडळी जमून धिंगाणा घालणे हा ठरलेला रोजचा कार्यक्रम व्हायचा. लपाछापी, पकडा-पकडी, झट-पट, आंधळी कोशिंबीर (या खेळाच्या नावात अशी अचानक कोशिंबीर का आहे हे मला अजूनही कळलं नाहीये), झुंजू-मुंजू, दगड का माती,खांब-खांब, डबडा-आईस-पाईस, खो-खो, धप्पा असे रोज नवे खेळ.. नवे नियम....नवी भांडणं.... :) टाईम प्लीज, नवा-गडी-नव-राज्य, एकावर नेम-सात-राज्य, चिडीचा डाव रडी या रिती भाती मात्र सगळ्या खेळात सारख्याच. खेळता खेळता अंधार पडायला लागला की अधून मधून नजर शेजारच्या मंदिरातल्या घड्याळावर जायची. सुट्टी साठीच फक्त ७ चं कसं बसं वाढवून मिळालेलं सव्वा-सातचं लिमिट मोडलं की होणारे दुष्परिणाम वाईट असायचे. त्यामुळे वेळेत घरी जाऊन जेवण, थोडा TV वगैरे झालं की बाबांच्या भोवती आमची भुणभुण सुरु व्हायची. आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की खरं तर बाबांनाही उत्साह यायचा.... ते आपणहून गच्चीवर झोपायला जायचा प्रस्ताव मांडायचे. आमच्या गच्चीला चांगले कठडे नसल्यामुळे आई आणि आज्जी थोड्या नाखुशीनीच परवानगी द्यायच्या. मग गाद्या, उश्या, पांघरुण, मच्छरदाणी, टेबल lamp, एक्स्टेन्शन वायर, पुस्तक, पाण्याची बाटली असा सगळा संसार गोळा करून मोर्चा गच्चीकडे वळायचा. तिथे गाद्यांवर पहुडल्यावर कितीही पांघरूण गुरफटून घेतलं तरी हळूच वाऱ्याची गार झुळूक आत यायची आणि दिवसभर केलेल्या दंग्याचा शीण बरोबर घेऊन निघून जायची. बाबांनी आधी अनेक वेळा सांगितलेल्या त्याच त्या गोष्टी उघड्या आभाळाखाली, चांदण्यांकडे बघता बघता ऐकल्या की उगाच अजूनच गूढरम्य वाटायला लागायच्या आणि या वेळी कदाचित गोष्टीचा शेवट वेगळाच होईल की काय असं वाटायचं. गोष्ट ऐकता ऐकता, बाजूची हाताभराच्या अंतरावरची नारळाची डोलणारी झाडं बघता बघता डोळे जड व्हायला लागायचे.
असेच चटचट दिवस सरून महिना होत आला की मात्र हळूहळू " मला आयुष्यात कधी सुट्टीचा कंटाळा येणं शक्य नाही" या विश्वासावर शंका यायला लागायची. मग घरात गावाला जाण्याविषयीच्या चर्चेचे वारे वाहायला लागायचे आणि एखाद्या मावशी, आत्या, काका, आजोबा यांच्याकडे जाण्याचं निश्चित व्हायचं. गावाला जाण्याचा उत्साह हा रेल्वे प्रवास असेल तर दहा पटींनी वाढायचा आणि तरी प्रवासाच्या दिवशी रिक्षानी स्टेशन कडे जाताना दर वेळी न चुकता लागणारी ' पुणे सोडून दूर चालल्याची' हुरहूर लागायची. पण एकदा प्रवास सुरु झाला की आवळा-सुपारी, श्रीखंडाच्या गोळ्यांपासून सुरु होणारी चरन्ति अखंड चालू व्हायची आणि गाण्याच्या भेंड्या, पत्ते असे रेल्वे प्रवासात झालेच पाहिजेत असे सोपस्कार करता करता गाडी शेवटच्या स्टेशनवर यायची सुद्धा. मग जिथे कुठे गावाला गेलो असू तिथे भरपूर लाड करून घेऊन, भरपूर हिंडून, नातेवाईकांना भेटून, त्या त्या ठिकाणाचा स्पेशल चिवडा किंवा मिठाई वगैरे बांधून घेऊन परतीचा प्रवास सुरु व्हायचा आणि पुण्याला येताक्षणी परत सगळं ओळखीचं दिसल्यावर बरं वाटायचं.

प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत काही खास उपक्रम घडायचे. आई आणि आजी एखाद्या दिवशी लोणचं घालायचा घाट घालायच्या. बाबांबरोबर मंडई मध्ये जाऊन आई कैऱ्या फोडून आणायची आणि घरी आली की तो कच्च्या कैऱ्यांचा घमघमाट स्वस्थ बसूच द्यायचा नाही. आम्ही एक एक फोड तोंडात टाकत कैऱ्या धुवून, पुसून देणे अश्या कौशल्यहीन कामांना हातभार लावायचो. मसाला कालवला की 'या वर्षीचा लोणचं मागच्या वर्षीच्या लोणच्यापेक्षा जास्त लाल, झणझणीत होणार आहे की नाही ' याचे अंदाज बांधून पैज लावायचो. असाच अजून एक उत्साहाचा दिवस पापडांचा असायचा. साबुदाण्याच्या वाळायला ठेवलेल्या पापड्या कच्च्या असतानाच अर्ध्या संपायच्या आणि वर वर रागावणाऱ्या आईला पण मधूनच एखादी कच्ची पापडी खायचा मोह आवरायचा नाही. :)

असं होत होत अचानक कधी तरी कालनिर्णय चं पान उलटायचं आणि पहिल्या पावसाचे वेध लागायचे. सहसा नव्या पुस्तक वह्यांचा आणि मातीचा सुगंध पाठोपाठच घरात यायचा. शाळेच्या नव्या वर्षाची उत्सुकता डोक्यात आणि पहिल्या पावसाची चाहूल हवेत असतानाचा तो काळ खूप मजेदार असायचा. तो असाच चालू रहावा असं वाटत असतानाच जोरात वारा सुटायचा आणि काही कळायच्या आत पहिल्या सरी येऊन बिलगायच्या. पहिल्या पावसात भिजलो नाही असा एकही उन्हाळा संपायचा नाही. कधी गारा वेचत, कधी चिखलात उड्या मारत, मातीचा वास उरात भरून घेत तर कधी सायकल वर टांग टाकून गावभर फिरत, वरून येणारा प्रत्येक थेंब झेलायची पराकाष्टा करत उन्हाळ्याचा अंत साजरा केला जायचा. जेवढी तळमळीनी उन्हाळ्याची वाट पाहिली जायची ती सुट्टीतल्या या अश्या हजार आनंदी क्षणांनी सार्थ व्हायची आणि गालावर ओघळणाऱ्या अश्रूंनी नव्हे, पण पहिल्या टपोऱ्या थेंबानी, प्रेमानी उन्हाळ्याला निरोप दिला जायचा. अशी लाडकी उन्हाळ्याची सुट्टी ... कलिंगडाच्या फोडीसारखी गोड आणि कैरीसारखी आंबट ... उसाचा रस, कोकम सरबत आणि पन्ह्यासारखी तोंडाला पाणी आणणारी उन्हाळ्याची सुट्टी... कोकिळेच्या गोड गाण्यासारखी... सूर्यास्ताच्या रंगीबेरंगी पश्चीमेसारखी ... काटे-सावरी च्या हातातून निसटणाऱ्या म्हातारी सारखी उन्हाळ्याची सुट्टी ...'पुढल्या वर्षी लवकर ये' असं न सांगताही नियमित येणारी उन्हाळ्याची सुट्टी...

विचारात, सुट्टीच्या आठवणींमध्ये एवढी गुरफटून गेले होते की भान आलं तेंव्हा जाणवलं... दुपार होऊन गेलीये ... भूक लागलीये... मग अंगाला सन स्क्रीन फासून, डोळ्यावर गॉगल चढवून, AC घरातून बाहेर पडले... AC बस मधून AC मॉल मध्ये जाण्यासाठी. विरोधाभास खूप मोठा होता हे जाणवून हसू आलं. शेवटी न राहवून गॉगल काढला तशी त्या वरून तळपणाऱ्याची करडी नजर टोचली. पण उन्हाच्या त्या चटक्यात सुद्धा चेहऱ्यावरचं हसू तसंच राहिलं. त्यालाही बहुदा ओळखीची काही तरी खूण पटली असावी.. तो समाधानी हसला आणि ढगाआड गेला.


________ जुई चितळे


ऋतुगंध- वसंत 2011, (सिंगापूर) मध्ये पूर्व-प्रकाशित 

Sunday, April 17, 2011

शोधा गं ..


शोधा गं ... शोधा गं...फांदी -फांदीवर शोधा गं....
हाती जे जे येईल त्याचा प्रत्यय नसेल साधा गं...

खोपा गं... खोपा गं ... फांदी-फांदी वर खोपा गं ...
गोजिरवाण्या संसारातच सुखाचा रस्ता सोपा गं....

झोका गं... झोका गं ...फांदी-फांदी वर झोका गं...
अवखळ निर्भीड उत्साहातच आयुष्याच्या मौजा गं ...

धोका गं ... धोका गं...फांदी-फांदी वर धोका गं...
खळगे-काटे-साप-मुंगळे चुकवत जगणे शिका गं...

मोहोर गं.. मोहोर गं... फांदी-फांदी वर मोहोर गं...
फुला -फळांच्या रस-स्वादाची गोडी केवळ थोर गं...

पाचोळा गं... पाचोळा गं... सांदी-फटीतून पाचोळा गं...
बहरा अंती सुकण्याचा ना नियम चुकला कोणा गं...

थांब गं... थांब गं... फांदी कुठेशी सांग गं...?
फांदी -फांदी जोडत जाता झाडच मिळते अखंड गं.... 

_ जुई