Thursday, December 24, 2020

असं म्हणू हवं तर...

 


त्या वयाचाच तो दोष होता…  म्हणू हवं तर 

भेटता क्षणी खेचले गेलो एकमेकांकडे 
कारणं काढत, ओळखी वाढवत जवळ येत गेलो 
एकमेकांसोबत मनाचे रंगीत पिसारे फुलवत गेलो 
त्या वेळी दाटून आलेल्या मल्हार-मेघांचाच दोष होता …  म्हणू हवं तर 

माझ्या वादळी आणि तुझ्या नितळ स्वभावात 
गुंतत गेलो, जोखत गेलो एकमेकांचं पाणी 
झंझावातासारखा मी सैरभैर झालेलो असताना 
शांत सरोवरासारख्या तुझ्या मिठीत माझे सारे आकांत भिडले  
त्या पहिल्या स्पर्शी रक्तात सळसळून गेलेल्या विजेचाच दोष होता..  
असं म्हणू हवं तर 

आणि मग जेंव्हा घेतल्या आणा - भाका - वचने 
चढ-उतारात हात धरायचे, जुळवून ठेवायची मने 
मावळणारा सूर्यही साक्षीला हजर राहताना रेंगाळला होता  
त्या संध्यासमयीचाच दोष होता…  म्हणू हवं तर 

पण उशिराने का होई ना, आता तरी कबूल करायला हवा 
टोचणारा, डाचणारा, छळणारा असला तरी आता स्वीकारायला तर हवा 
आपल्याच बाबतीत का घडला आणि म्हणून न्याय्य नसला तरी मान्यही व्हायला हवा 

एके काळी बसलेल्या घट्ट गाठी हळू हळू सैल पडून सुटतात 
खळाळणाऱ्या नद्या सुद्धा रोडावत जाऊन कधी तरी अदृश्य होतात 
पानं गळतात, फुलं सुकतात, पाखरांच्या वाटा चुकतात 
काही प्रश्नांची उत्तरं असतात काहींची नसतात 

कोणता बोल टोचला, कोणता अबोला खुपला 
माझी वाट बदलत गेली कि तुझाच हात सुटला 
माझ्या वादळामुळे खेळ तुटला कि तुझ्या थंड उदासीनतेने गोठला 
या गुंत्यात अडकून आता पुढचा प्रवास अवघड करण्यापेक्षा 
जेंव्हा सूर जुळलेत असं भासलं होतं त्या गाण्याचाच दोष होता…  म्हणू हवं तर 
किंवा त्या वयाचाच तो दोष होता … असं म्हणू हवं तर 

- जुई 

No comments:

Post a Comment