Friday, January 15, 2021

तू येतेस

 
 
माझ्याभोवती इतका गुंता
विचारांचा 
नात्यांचा 
माणसांचा 

तू येतेस धावदोऱ्याच्या टाक्यांसारखी 
सरळ 
स्पष्ट
सोपी 

माझ्याभोवती रंगीत गोंगाट
भडक  
अंदाधुंद 
कर्कश्श 

तू येतेस जुईच्या फुलासारखी 
नाजूक 
निर्मळ 
सुगंधीत  

माझ्याभोवती रोज लढाई 
वेळेची 
पैशांची 
विचारांची  

तू येतेस चिमणपाखरासारखी 
स्वच्छंद  
निष्पाप 
आनंदी 

तू येतेस 
मला वाचवतेस 
माझे भान सावरतेस 

पुन्हा कदाचित 
रस्ता चुकेल 
दिशा हरवेल 
ओळख पुसेल   

तेंव्हा सुद्धा 
पुन्हा ये 
उसवलेल्या मनाला 
टाका घालून जा 
उदास निराश जगण्याला 
अत्तर लावून जा 
पराभूत जीवाला
पंख देऊन जा 

तुझे हात माळून जा 
माझ्याभोवती 

- जुई

Saturday, January 2, 2021

तुझी कविता

काल ती भेटली होती
आणि दिवसभर चढला होता कैफ तिच्या भेटीचा

आधी थोडा अंदाज घेत, थोडं जपून बोलली… 
आणि मग अगदी थेट 
डोळ्यात डोळे घालून 
मनाच्या गाभ्यातल्या गोष्टी सांगू लागली 

मलाच जरा चोरट्यासारखं झालं 
काही आधीची ओळख पाळख नसताना 
इतकं जीवाभावाचं आज-काल 
कोण बोलतं ?

पण तिचाही मूड होता … 
आणि मला उत्सुकता 
४ क्षणांची भेट … पण वाटलं 
कि तासंतास तिने राहावं बोलत 
आणि मी ऐकत…  

हात हातात घेऊन, कानात प्राण आणून .. 
तिचा प्रत्येक शब्द झेलावा, जपावा 
आणि पुन्हा आठवण्यासाठीसुद्धा 
विसरला न जावा  … 
थेंबांचा नाद जसा पावसाळ्याला 
रेशमी अस्तर लावतो 
तसा तिच्या शब्दांचा पदर
माझ्या श्वासांना जोडला जावा 

काल ती भेटली होती
आणि दिवसभर चढला होता कैफ तिच्या भेटीचा

- Jui

Thursday, December 31, 2020

स्वप्नपूर्ती

काळ्या सावळ्या अंबरात विखुरलेले मोती
खाली नक्षत्रांच्या प्रकाशाने भिजलेली रेती 

लाटांवर उमटलेले अगणित नीलमणी 
प्रकाशाच्या उ:शापाने उजळलेलं पाणी 

चंद्रास्ताच्या खूणा मोजत वितळणारं क्षितिज 
आठवणींच्या वेदनेने चमकून गेलेली वीज 

कवितेच्या ओळी ऐकत निश्चल उभी रात्र 
वार्‍याच्या अंधारओल्या मिठीत चिंब गात्रं 

आरोही लाटांनी चढणारी उदंड भरती 
तुझ्या नजरेतून हे बघणं हीच स्वप्नपूर्ती

- जुई 

Saturday, December 26, 2020

तू असा शेजारी

 
तू असा शेजारी गाढ झोपलेला.. 
श्वासांची संथ लय 
माझा हात तुझ्या छातीवर ठेवलेला 
तुझ्या हृदयाचे ठोके 
हाताला जाणवणारे 
निश्चित … आणि आश्वासक 

ते ठोके मी मोजत राहते 
त्यांच्या लयीवर माझ्या मनात उमटणारं 
संगीत ऐकत राहते 
ओळखीचं … आणि मोहक 

त्या संगीताच्या पार्श्वभूमीवर 
माझ्या दुसऱ्या हाताची बोटं 
तुझ्या मऊ केसातून फिरू लागतात 
त्यांचा स्पर्श माझ्या बोटातून 
मनापर्यंत पसरत जातो 
रेशमी …आणि सुखावणारा 

केसातून फिरणारी बोटं 
मग कानाच्या पाळीशी 
लडीवाळपणे खेळतात 
आणि गालावरून भुवईचं वळण घेऊन 
नाकाच्या सरळ रेषेत खाली येतात 
तिथे पुन्हा तुझ्या श्वासांचं संगीत जाणवतं 
धीमं… आणि संयत 

तुला कल्पना नाही 
पण केवळ तुझ्या झोपेतही 
माझ्या जाणीवा 
तू अश्या जिवंत करतोस 
आणि तुझ्या असण्यामुळे 
माझे श्‍वास होतात 
लयबद्ध .. आणि किती तरी समृद्ध! 

Thursday, December 24, 2020

मला कळतंय

 
घर-परंपरांच्या चौकटीत आल्यापासून सारखंच 
तुझं मन अडकलेल्या पाखरासारखं रडतंय 
मला कळतंय ...
पण चौकट मोडायचा धीर तुझा तुलाच शोधला पाहिजे 

मनापासून पाहिलेलं, हौसेने खुलवलेलं 
तुझं स्वप्न उंबऱ्याबाहेर जाण्यासाठी पळतंय 
मला कळतंय ...
पण स्वप्नासारखंच सत्यही तुला डोळे उघडून पाहिलं पाहिजे 

निराशेच्या अंधारात स्वतःशीच झुरताना 
डोळ्यामधून पाझरणारं पदरामागेच अडतंय 
मला कळतंय ...
पण आसवांना थांबवून आतल्या आवाजाला शोधलं पाहिजे 

नाती-गोती, रूढी-विधी यात सगळे गुंतले असता 
खिडकी बाहेरचं मुक्त जग खुणावून तुला छळतंय 
मला कळतंय ...
पण जुन्या डोळ्यांना नवीन दृष्टी द्यायला आता शिकलं पाहिजे 

धाक, आदर, प्रेम अश्या न तुटणाऱ्या बंधनातून 
बाहेर पडायच्या विचारांनी तुझं काळीज हलतंय 
मला कळतंय...
पण या हिमतीचं मोल जाणून तुला पाऊल उचललं पाहिजे 
     या हिमतीचं मोल जाणून तुला पाऊल उचललंच पाहिजे 

- जुई 

धक्का

 
एकमेकांना भेटायचा आग्रह कधी आपल्याला करावा लागला नाही 
ठरलेल्या ठिकाणी आपण दोघंही यायचो … 
तू माझ्याआधी म्हणजे वेळेत यायचास 
आणि मी तुझ्याआधी … म्हणजे वेळेत निघायचे 
दरम्यान नेहेमी मीच भरभरून बोलत राहायचे  
छोट्या मोठ्या गोष्टींचं पाल्हाळ लावत बसायचे 
तुला त्याचा कधीच कंटाळा यायचा नाही 

कधी मी खुशीत असले कि तू ही माझ्याबरोबर मन-मोकळं हसायचास 
कधी उदास असले तर शांतपणे हातावर आश्वासक हात ठेवायचास 
दंगा करणे, चिडवणे, चेष्टा करणे किंवा बिनधास्त मनात येईल ते सांगून टाकणे 
या सगळ्याची जबाबदारीसुद्धा माझ्यावरच असायची 
तू आपणहून फारसं कधी काही बोलायचा नाहीस 
आणि तुला बोलतं करून स्वतः शांतपणे ऐकावं असं मलाही कधी वाटायचं नाही 
मला वाटायचं कि तू मला पुरतं ओळखणारा, मला समजून घेणारा आहेस 
तशीच मी हि तुला ओळखून आहे. 
बहुदा मला ठाम विश्वासच होता 
कि, जर काही बोललास तर मला कळला असतास तेवढाच न बोलताही कळलाच आहेस 

आज सकाळी मात्र माझं बोलणं मध्येच तोडून तू मला अचानक विचारलंस की "आता असं ठरवून, तास- दोन तास उशिरा येउन, घाईघाईत भेटून, अशी नॉन stop बडबड करून घड्याळाच्या धाकानी मधेच निघून जाण्यापेक्षा … 
निवांतपणे घरीच का येत नाहीस ? कायमची ? मग आरामात बसून रोज माझं डोकं खा …. कसं?"
डोळे मिचकावून हसलास आणि 'विचार करून सांग मला' असं म्हणून 
मला तिथेच एकटीला, गोंधळलेल्या अवस्थेत सोडून, वेळेत… म्हणजे माझ्या आधी निघून गेलास 
तू इतक्या साळसूद पणे मला असं काही इतक्यात विचारशील असं वाटलंच नव्हतं. 

तुझ्या त्या नितळ डोळ्यांमागे अश्या अदृश्य खट्याळ गुहा असतील अशी शंकाही कधी आली नव्हती
तुला मी पुरतं ओळखलं आहे ह्या माझ्या विश्वासाला असा धक्का बसला असला तरी 
त्या धक्क्यामुळे मी तुझ्या प्रेमात अजूनच जोरात पडले असं वाटतंय 
आता पडल्यामुळे झालेल्या जखमा तूच भरून काढू शकतोस म्हणून मला तुझ्या घरी यावंच लागणार !!

- जुई 

असं म्हणू हवं तर...

 


त्या वयाचाच तो दोष होता…  म्हणू हवं तर 

भेटता क्षणी खेचले गेलो एकमेकांकडे 
कारणं काढत, ओळखी वाढवत जवळ येत गेलो 
एकमेकांसोबत मनाचे रंगीत पिसारे फुलवत गेलो 
त्या वेळी दाटून आलेल्या मल्हार-मेघांचाच दोष होता …  म्हणू हवं तर 

माझ्या वादळी आणि तुझ्या नितळ स्वभावात 
गुंतत गेलो, जोखत गेलो एकमेकांचं पाणी 
झंझावातासारखा मी सैरभैर झालेलो असताना 
शांत सरोवरासारख्या तुझ्या मिठीत माझे सारे आकांत भिडले  
त्या पहिल्या स्पर्शी रक्तात सळसळून गेलेल्या विजेचाच दोष होता..  
असं म्हणू हवं तर 

आणि मग जेंव्हा घेतल्या आणा - भाका - वचने 
चढ-उतारात हात धरायचे, जुळवून ठेवायची मने 
मावळणारा सूर्यही साक्षीला हजर राहताना रेंगाळला होता  
त्या संध्यासमयीचाच दोष होता…  म्हणू हवं तर 

पण उशिराने का होई ना, आता तरी कबूल करायला हवा 
टोचणारा, डाचणारा, छळणारा असला तरी आता स्वीकारायला तर हवा 
आपल्याच बाबतीत का घडला आणि म्हणून न्याय्य नसला तरी मान्यही व्हायला हवा 

एके काळी बसलेल्या घट्ट गाठी हळू हळू सैल पडून सुटतात 
खळाळणाऱ्या नद्या सुद्धा रोडावत जाऊन कधी तरी अदृश्य होतात 
पानं गळतात, फुलं सुकतात, पाखरांच्या वाटा चुकतात 
काही प्रश्नांची उत्तरं असतात काहींची नसतात 

कोणता बोल टोचला, कोणता अबोला खुपला 
माझी वाट बदलत गेली कि तुझाच हात सुटला 
माझ्या वादळामुळे खेळ तुटला कि तुझ्या थंड उदासीनतेने गोठला 
या गुंत्यात अडकून आता पुढचा प्रवास अवघड करण्यापेक्षा 
जेंव्हा सूर जुळलेत असं भासलं होतं त्या गाण्याचाच दोष होता…  म्हणू हवं तर 
किंवा त्या वयाचाच तो दोष होता … असं म्हणू हवं तर 

- जुई